सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग आवश्यक ! – डॉ. नीलम गोर्‍हे, विधान परिषद उपसभापती

डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे – महिलांच्या सुरक्षिततेसमवेत महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. स्त्री आधार केंद्राच्या वतीने ‘जागतिक महिला हिंसाचार विरोधीदिना’चे औचित्य साधून ‘महिला सक्षमीकरण आणि महिलांची सुरक्षितता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये ‘महिलांचे समुपदेशन’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. गोर्‍हे बोलत होत्या. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी स्त्रीचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्यावरील होणार्‍या अन्यायाच्या संदर्भात कायद्याचा आधार आणि उपाययोजनांची माहिती देणे अन् त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करणे या त्रिसूत्रीचा विचार आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक यांनी ‘केशरी दिवस संस्कृती आणि कार्यपद्धती’ तर साहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी ‘स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलिसांची भूमिका आणि महिलांचे हक्क’ यासंदर्भात माहिती दिली.