सचिन वाझे यांनी परमबीर सिंह यांच्यासाठी वसुली केली ! – पोलिसांचा दावा

मुंबई – मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासाठी वसुली केली आहे, असा दावा मुंबई पोलिसांनी खंडणीच्या एका प्रकरणातील आरोपपत्रात केला आहे. बिमल अग्रवाल यांच्या उपाहारगृहावर दोन वेळा धाड न टाकण्यासाठी आरोपीने त्यांच्याकडून ९ लाख रुपये उकळल्याची तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य तिघे यांचा समावेश आहे. या संदर्भातील आरोपपत्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ४ डिसेंबर या दिवशी प्रविष्ट केले आहे.

या आरोपपत्रामध्ये वाझे यांच्या म्हणण्यानुसार, ‘वसुलीच्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम सिंह यांच्याकडे गेली आणि उर्वरित रक्कम त्यांनी ठेवली’, असेही नमूद करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘राज्यात खंडणीच्या पाच प्रकरणांमध्ये परमबीर सिंह यांचे नाव आले आहे. या गुन्ह्यातील आरोपींपैकी सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांना जामीन मिळाला आहे, तर विनायक सिंग आणि रियाझ भाटी हे अजूनही फरार आहेत. आरोपपत्रात सचिन वाझे यांनी परमबीर सिंह यांना ‘नंबर एक’ म्हणत पैशांची वसुली केली, अशी पुष्टी तीन ते चार साक्षीदारांनी केली आहे. वाझे यांना अनेक मोठ्या (हायप्रोफाईल) प्रकरणांचे अन्वेषण करण्यास सांगण्यात आले होते. सिंह, वाझे आणि इतर आरोपी हे क्रिकेट बुकी, तसेच उपाहारगृह अन् बारमालक यांच्याकडून पैशांची मागणी करत होते. पैसे न दिल्यास त्यांना अटक करण्याची आणि त्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकण्याची धमकी वाझे द्यायचे, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.