ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, या विचाराने त्यांच्या मुलांना साधना करण्यास विरोध करतात; परंतु ते लक्षात घेत नाहीत की, हे नातेवाईक केवळ याच जन्मातील आहेत. पालकांनी ‘जन्मोजन्मींचे नाते असणार्‍या देवाला काय अपेक्षित आहे?’, याचा प्रथम विचार केला पाहिजे आणि मुलांना साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य केले पाहिजे. ती त्यांची साधनाही होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१)

प्रत्येक क्षणी साधनारत असलेली आणि ‘गुरुचरणांजवळ जायचे आहे’, असा एकच ध्यास असलेली रामनाथी आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला अमित औंधकर (वय १४ वर्षे) !

कु. अपाला औंधकर

‘कु. अपाला मे मासात गोवा येथे आमच्या घरी (आजोळी) आली होती. तेव्हा तिची लहान वयात असलेली ‘साधनेची तळमळ आणि गुरुचरणांजवळ जाण्याची ओढ’ आम्हाला अनुभवता आली. गुरुचरणांजवळ जाण्याची ओढ’ आम्हाला अनुभवता आली

१. रात्रंदिवस ‘गुरुचरणांजवळ जायचे आहे’, असा एकच ध्यास असणे

अपाला गोव्याला आली, त्या वेळी दळणवळण बंदी असल्यामुळे तिला आश्रमात लवकर जाता आले नाही. तिला गुरुचरणांजवळ जाण्याची पुष्कळ तळमळ होती. तिला आश्रमात येण्याचा निरोप येईपर्यंत तिची स्थिती ‘पाण्याविना मासोळी’सारखी झाली होती.

श्री. अशोक रेणके

२. भाववृद्धीसाठी प्रयोग करतांना ‘साक्षात् परात्पर गुरुदेवांसमोर बसून त्यांना साधनेविषयी प्रश्न विचारत आहे आणि गुरुदेव तिला त्यांची उत्तरेही सांगत आहेत’, असा भाव ठेवणे

त्या कालावधीत ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण काढून सतत भावावस्थेत असायची. तिला परात्पर गुरुदेवांची ओढ लागल्यामुळे तिची हळूहळू खाण्या-पिण्याची आवडही न्यून झाली. याआधी ती घरी आल्यावर मला तिच्या आवडीचे पदार्थ करायला सांगायची; परंतु या वेळी तिला अन्य बाह्य गोष्टींमध्ये रस नव्हता. आम्हा सर्वांची जेवणाची वेळ झाली, तरी ती जेवायला येत नव्हती.

त्या वेळी ती भाववृद्धीसाठी प्रयोग आणि प्रार्थना करत असायची. त्या वेळी ‘ती साक्षात् गुरुदेवांसमोर बसून त्यांना साधनेविषयी प्रश्न विचारत आहे आणि गुरुदेव तिला त्यांची उत्तरेही सांगत आहेत’, असा तिचा भाव असायचा. तिचे हे प्रयत्न पाहून आमची भावजागृती व्हायची.

सौ. सुजाता रेणके

३. अपालाने भावप्रयोग आणि नृत्याभ्यास करतांना तहान-भुकेचा विसर पडून अनुभवलेला भावप्रयोग लिहिणे अन् तिने केलेले लिखाण वाचतांना भावजागृती होणे

एकदा ती घरी असतांना दुपारी जेवणाची वेळ झाली होती. मी ‘‘चला जेवायला’’, असे म्हटल्यावर अपाला म्हणाली, ‘‘मी ५ मिनिटांत येते. तोपर्यंत तुम्ही जेवायला बसा.’’ ती खोलीत जाऊन भावप्रयोग आणि नृत्याभ्यास करत राहिली. आमचे जेवण झाले. सर्व आवरले, तरी ती खोलीतून बाहेर आली नाही; म्हणून ‘झोपली असेल कि काय पाहूया’, असे वाटून मी (सौ. सुजाता रेणके) खोलीत गेले. तेव्हा मला दिसले, ‘अपाला शांतपणे अनुभवलेला भावप्रयोग लिहीत आहे.’ तिने सलग ८ पाने लिहिली होती. तिच्या लिखाणात कुठे खाडाखोड नव्हती. तिने केलेले लिखाण वाचतांना आमची भावजागृती झाली.

४. ‘तिला आश्रमात बोलावले, त्या दिवशी रात्री तिला शांत झोप लागली’, असे ती म्हणाली. ‘तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर हा जीव केवळ साधनेसाठीच पृथ्वीवर आला आहे’, असे आम्हा दोघांना वाटले.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे गुरुदेवा, आम्हाला अपालाकडून गुरुदेवांप्रतीचा भाव, तळमळ अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमच्याच कृपेने आम्हाला एवढ्या लहान वयात साधनेची तीव्र तळमळ असलेली नात मिळाली. गुरुदेवा, आम्ही धन्य धन्य झालो. ‘अपालाप्रमाणे आम्हालाही गुरुचरणांजवळ जाण्याची ओढ लागू दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’

– श्री. अशोक रेणके आणि सौ. सुजाता रेणके (कु. अपालाचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२१)

समष्टी प्रकृती असूनही व्यष्टी आणि समष्टी साधनेचा सुरेख संगम असलेली रामनाथी आश्रमातील अलौकिक दैवी बालके !

‘गोवा येथील सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात दैवी बालकांच्या सत्संगात मी जे अनुभवले, त्यासंबंधी काही सूत्रे मी येथे दिली आहेत.

पू. तनुजा ठाकूर

१. बहुतांश वेळा समष्टी प्रकृती असणार्‍या साधकांना व्यष्टी साधना करण्याचे गांभीर्य नसल्यामुळे त्यांचे स्वभावदोष न्यून न होणे आणि प्रगती न होणे

‘धर्मप्रसार करतांना मला असे जाणवले की, ‘सर्वसाधारणपणे समष्टी प्रकृती असलेल्या साधकांना व्यष्टी साधनेची तितकीशी ओढ नसते.’ समष्टी साधकांची वृत्ती बहिर्मुख असल्यामुळे त्यांच्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन होत नाही; म्हणून कधी कधी अनेक वर्षे साधना करूनही त्यांची अपेक्षित प्रगती होत नाही. त्यांना वारंवार व्यष्टी साधना करण्याविषयी सांगावे लागते. ते नामजप आणि त्यांना आध्यात्मिक त्रास होत असतांना सांगितलेले नामजपादी उपाय करतात; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्यासाठी त्यांना वारंवार सांगितल्यावर ते काही वर्षांनी ही प्रक्रिया चालू करतात. अनेक वेळा ‘त्यांना त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांमुळे समष्टीची कशा प्रकारे हानी होते ?’, हेही पुनःपुन्हा सांगावे लागते.

२. बहुतांश दैवी बालकांमध्ये व्यष्टी आणि समष्टी साधनेचे गांभीर्य पहायला मिळणे अन् लहान वयातच ते स्वभावदोष निर्मूलनासाठी सतर्क असल्याचे दिसून येणे, यातून त्यांचे विलक्षण अलौकिकत्व दिसणे

बहुतांश दैवी बालकांची समष्टी प्रकृती आहे; कारण ते हिंदु राष्ट्र्राचे कार्य करण्यासाठी या पृथ्वीवर जन्माला आले आहेत. त्यामुळे या दैवी बालकांमध्ये व्यष्टी आणि समष्टी साधनेचा सुरेख संगम आहे. काही दैवी बालके केवळ ७ ते ९ वर्षांची आहेत, तरीही ते नियमित स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतात, उदा. एखादी चूक झाल्यावर ती सारणीमध्ये आणि आश्रमातील फलकावर लिहिणे,

स्वभावदोष निर्मूलन करण्यासाठी स्वयंसूचना घेणे, स्वतःच्या अहंच्या लक्षणांविषयी सतर्क रहाणे इत्यादी. त्यांच्या मनात अहंविषयी काही विचार आले, तर ही बालके सत्संगात प्रामाणिकपणे आत्मनिवेदन करतात. एक केवळ १० वर्षांची दैवी बालिका आहे.

तिच्याविषयी एका अन्य साधिकेने सांगितले, ‘‘काही कारणाने तिने दिवसभरात स्वभावदोष दूर करण्यासाठीची सारणी भरली नाही, तर ती रात्री ११ वाजेपर्यंत जागून सारणी लिहिते आणि मगच झोपते.’’ या लहान वयात तिची तळमळ प्रशंसनीय आहेच; पण यातून या दैवी बालकांचे विलक्षण अलौकिकत्व दिसून येते.

३. दैवी बालकांचे स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या संदर्भातील चिंतन ऐकून आश्चर्यचकित होणे, दैवी बालकांप्रमाणे चिंतन अनेक वर्षे साधना केलेला साधकही करू न शकणे,भावी हिंदु राष्ट्र्र चालवण्यासाठी अशाच दिव्यात्म्यांची आवश्यकता असणे

स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचा प्रयत्न करण्याच्या समवेत त्यांचे या संदर्भात जे चिंतन होते, ते आश्चर्यचकित करणारे आहे. दैवी बालक स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या संदर्भात त्यांचे विचार सांगतात, तेव्हा ‘मागील २० वर्षांपासून साधना करणारे प्रौढ वयातील साधकही असा विचार करू शकत नाहीत’, असे वाटते. त्यातून त्यांचे व्यष्टी साधनेविषयीचे गांभीर्य लक्षात येते. दैवी बालकांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात केलेले चिंतन त्यांच्यामधील उच्च प्रतीचा भाव अन् अत्यंत प्रगल्भ ज्ञान दर्शवते. हिंदु राष्ट्र्र चालवण्यासाठी आम्हाला अशाच दिव्यात्म्यांची आवश्यकता आहे.

४. कृतज्ञता

प.पू. गुरुदेवांच्या समष्टी कार्यासाठी अशा दैवी बालकांचे अवतरण झाले आहे. ‘ज्या कार्याची आपण कल्पनाही करू शकत नाही’, एवढे प्रचंड समष्टी कार्य प.पू. गुरुदेवांनी आतापर्यंत केले आहे. हा निश्चितपणे त्याचाच परिणाम आहे. यासाठी आम्ही साधक त्यांच्या श्रीचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ. (३.११.२०२१)