सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी १६ डिसेंबरपर्यंत विविध निर्बंध

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – एस्.टी.च्या कर्मचार्‍यांचा संप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, विजय दिन, तसेच जिल्ह्यात होणार्‍या आगामी निवडणुका यांच्या कालावधीत जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात १६ डिसेंबर २०२१ पर्यंत विविध निर्बंध लागू केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, बंदुका आदी शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बाळगणे; स्फोटक पदार्थ बाळगणे, समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा कृती करणे, सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे, शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे आदी कृत्ये करण्यावर निर्बंध आहेत. कलम ३७(३) नुसार जिल्ह्यामध्ये ५ अथवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे, यांस निर्बंध आहेत.

ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये आणि अधिकार बजावणी यांच्या संदर्भात शारीरिक इजा होईल, अशा वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते, ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अथवा संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस अधिकारी यांची अनुमती घेतली आहे, अशा व्यक्तींना आणि विवाहादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस हे निर्बंध लागू होणार नाहीत.