राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३ डिसेंबर २०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

प्रत्येकातील परमेश्वररूपी ज्योत बघण्यासाठी मनाला स्नान घालणे म्हणजे उपासना करणे आवश्यक !

‘प.पू. विनोबा भावे म्हणतात, ‘कंदिलाची वात जळत असते, तेव्हा वर काच असते; पण ती काच मळकी असेल, तर प्रकाश स्वच्छ पडत नाही.’ तशी परमेश्वराची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात असली, तरी बुद्धीरूपी काच अस्वच्छ असल्यास प्रकाश स्वच्छ प्रगट होणार नाही. त्यामुळे मनाला स्नानाची आवश्यकता आहे. ‘मनाचे स्नान म्हणजे उपासना !’ ‘मनाची एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे’, असे अमेरिकी लेखक नेपोलियन हिल याने त्याच्या ‘लॉ ऑफ सक्सेस’ या पुस्तकात म्हटले आहे.’- डॉ. लुकतुके (साभार : मासिक ‘भाग्यनिर्णय’)


राजशिष्टाचाराची अपेक्षा करणारे लोकप्रितनिधी ‘स्वतःचे आचरण आदर्श असते का ?’ याचा विचार कधी करणार ?

‘भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री असतांना रेल्वेचा एक अपघात झाल्यावर त्यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले होते. आज असे किती शासनकर्ते आहेत, जे भ्रष्टाचाराचा आरोप होऊन शिक्षा भोगून बाहेर आले आहेत ? किंवा जामिनावर सुटले असतांनाही त्यांची पदाची आशा सुटत नाही ? पदाचा दुरुपयोग करून अनेक लोकप्रतिनिधी माया गोळा करून धनाढ्य झालेले पहायला मिळतात. विधान परिषद आणि विधानसभा येथे लोकप्रतिनिधींचे वर्तन काही वेळा अयोग्य असते. योग्य प्रकारे चर्चा न करता भांडण करणे, अयोग्य भाषा वापरणे, हाणामारीचे प्रसंग घडणे, कागद भिरकावणे, असे प्रकार सभागृहात घडतात. लोक दूरदर्शन संचावर हे सर्व पहात असतात. तेव्हा लोकांच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी आदर कसा निर्माण होईल ? ‘अशा लोकप्रतिनिधींचा सन्मान कुणी का म्हणून करावा ?’ हा प्रश्न जनतेने विचारल्यास त्याचे उत्तर प्रशासनाकडे असल्यास त्यांनी द्यावे. त्यामुळे राजशिष्टाचाराच्या गोष्टी करायच्याच असतील, तर त्या सन्मानापुरत्या मर्यादित न ठेवता, राजशिष्टाचाराच्या अंतर्गत येणारे कर्तव्यपालनही लोकप्रतिनिधींनी करायला हवे.’


‘लोकप्रतिनिधींना सन्मान द्या’, असे सरकारला वेळोवेळी आदेश काढून का सांगावे लागते ? याचा विचार लोकप्रतिनिधी कधी करणार?

‘सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या ‘प्रजा फाऊंडेशन’ने महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी गत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी घोषणापत्रात दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासनांची पूर्तता केली ? याचा आढावा घेतला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा अभ्यासच त्यांनी जनतेपुढे मांडला आहे. प्रतिवर्षी आश्वासने द्यायची आणि त्यांवर मते मिळवायची; मात्र प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्ती न करता जनतेच्या तोंडाला पाने पुसायची, अशी राजकीय पक्षाची रीत झाली आहे. जनतेची फसवणूक करून
पुढच्या वर्षी पुन्हा मते मागण्यासाठी येणार्‍या लोकप्रतिनिधींना राजशिष्टाचारामध्ये खोटी आश्वासने देणे बसते का ? हा प्रश्न विचारायला हवा. नव्हे, तशी तरतूदच सरकारने करायला हवी. अन्यथा राजशिष्टाचाराचा सोयीनुसार वापर करण्यासारखे आहे. ‘लोकप्रतिनिधींना सन्मान द्या’, असे सरकारला आदेश काढून का सांगावे लागत आहे ? हेही विचार करायला लावणारे आहे.’ (२८.११.२०२१)


लोकप्रतिनिधींचे वर्तन आदर्श असल्यास जनता स्वतःहून सन्मान देईल, त्यासाठी आदेश देण्याची आवश्यकता भासणार नाही !

‘अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा एका महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. भारतात मात्र एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर त्याला आयुष्यभर जनतेच्या करातून निवृत्तीवेतन दिले जाते. चंद्रगुप्त मौर्य याला सम्राट करून त्याचा महाअमात्य म्हणून न रहाता झोपडीत रहाणारे आर्य चाणक्य भारतातील आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आदर्श वर्तनातून सन्मानास पात्र होते. आदर्श राज्यकारभार करणार्‍या प्रभु श्रीरामाला भारतीय जनता आदर्श राजा मानते. लोकप्रतिनिधींनी आदर्श निर्माण केल्यास प्रशासनातील अपप्रकार थांबतील. चांगल्या प्रशासनाने उत्तम सेवा दिल्यास जनता लोकप्रतिनिधींचा सन्मान करेल; मात्र तशी स्थिती नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी राजशिष्टाचाराचे नियम अंगीकारावेत. केवळ शासन आदेशावर सन्मानाची अपेक्षा करण्यापेक्षा प्रशासन आणि जनता यांच्या सन्मानास पात्र होण्याची कृती करावी. मग सन्मानासाठी पुन:पुन्हा आदेश काढण्याची वेळ येणार नाही.’ (२८.११.२०२१)