भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव : कर्नाटकात २ रुग्ण आढळले ! – केंद्र सरकारची माहिती

नवी देहली – भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचा शिरकाव झाला असून कर्नाटक राज्यात याचे २ रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. अग्रवाल पुढे म्हणाले की, हे दोन्ही रुग्ण कर्नाटक राज्यातील असून त्यांतील एकाचे वय ४६ वर्षे, तर दुसर्‍याचे वय ६६ वर्षे आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे आहेत. ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेे; म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही; परंतु काळजी घेणे आवश्यक आहे.

देशातील ५५ टक्के प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्र राज्यात !

लव अग्रवाल म्हणाले की, एका मासापासून देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने न्यून होत आहेत. १५ जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या चाचणीच्या सकारात्मकतेचे प्रमाण अजूनही १० टक्कयांहून अधिक आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. १८ जिल्ह्यांत हे प्रमाण ५ ते १० टक्के आहे. केरळ आणि महाराष्ट्र ही दोनच राज्ये अशी आहेत, जेथे १० सहस्रांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. देशातील ५५ टक्क्यांहून अधिक प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्र केवळ या दोन राज्यांत आहेत.

देशातील ४९ टक्के लोकसंख्येला मिळाले आहेत लसीचे दोन्ही डोस !

अग्रवाल पुढे म्हणाले की, देशातील ४९ टक्के लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम चालू झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे ९९ सहस्र ७६३ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ घंट्यांत देशात कोरोनाचे ९ सहस्र ७६५ नवीन रुग्ण आढळले आहेत.