राज्यातील ‘ओमिक्रॉन’च्या संसर्गाविषयी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करावी ! – मंत्रीमंडळाची मागणी

मुंबई – कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या संसर्गाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘देशभरातील आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील प्रवासी यांना शोधणे सोपे जाईल’, असे मत व्यक्त केले. याविषयी पंतप्रधानांना अवगत करण्याविषयी चर्चा झाली.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढवण्याला मंत्रीमंडळाची मान्यता !

सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या न्यूनतम ५० आणि अधिकाधिक ७५ इतकी आहे. यामध्ये सुधारणा करून ही संख्या न्यूनतम ५५ आणि अधिकाधिक ८५ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या २ सहस्रांवरून २ सहस्र २४८ इतकी होणार आहे. यासह पंचायत समितीच्या सदस्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेण्यात आला. येत्या विधीमंडळाच्या अधिवेशनात याविषयीचे विधेयक चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे.

विधीमंडळात हे विधेयक संमत झाल्यास त्यावर पुढील कार्यवाही होईल.