साधकांचे आधारस्तंभ असलेले चि. प्रदीप वाडकर अन् सेवेची तळमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या चि.सौ.कां. प्रियांका जगताप !

इतरांशी सहजतेने जवळीक साधणारे आणि साधकांचे आधारस्तंभ असलेले पुणे येथील चि. प्रदीप वाडकर अन् सेवेची तळमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या फोंडा (गोवा) येथील चि.सौ.कां. प्रियांका जगताप !

२९.११.२०२१ या दिवशी पुणे येथील चि. प्रदीप वाडकर आणि फोंडा (गोवा) येथील चि.सौ.कां. प्रियांका जगताप यांचा शुभविवाह आहे. त्या निमित्त चि. प्रदीप यांचे सहसाधक आणि चि.सौ.कां. प्रियांका यांचे कुटुंबीय अन् सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. प्रदीप वाडकर आणि चि.सौ.कां. प्रियांका जगताप यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. प्रदीप वाडकर यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. प्रदीप वाडकर

सौ. भक्ती कापशीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. उत्तम आकलनक्षमता

‘मी पुणे जिल्ह्यात ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतील विज्ञापनांशी संबंधित सेवा करायचे. तेव्हापासून माझा प्रदीपशी परिचय झाला. त्याची आकलनक्षमता पुष्कळ चांगली आहे. त्याने लवकरच सर्व सेवा शिकून आत्मसात केल्या.

२. इतरांना आधार वाटणे

तो सेवेसाठी सदैव तत्पर असतो. सेवा करतांना मला त्याचा पुष्कळ आधार वाटत असे. कितीही तातडीच्या सेवा असल्या, तरी प्रदीप असल्यामुळे मला ताण येत नसे.’ (२२.११.२०२१)

श्री. शंभू गवारे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), कोलकाता, बंगाल.

१. मनमोकळेपणा

‘प्रदीप मला ‘त्याच्या घरातील अडचणी, सत्सेवा किंवा व्यष्टी साधनेच्या संदर्भातील सूत्रे’, यांविषयी अतिशय प्रांजळपणे आणि मनमोकळेपणे सांगतो.

२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

व्यष्टी साधनेचे प्रयत्न आदर्श होण्यासाठी तो मन लावून प्रयत्न करतो. त्याचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले असतात. त्याच्या प्रयत्नांमधून इतर साधकांनाही प्रेरणा मिळते.’ (२२.११.२०२१)

कु. गीतांजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. जवळीक साधणे

‘प्रदीपमध्ये इतरांशी जवळीक साधण्याची उत्तम कला आहे. ‘इतरांना साधनेसाठी काय आवश्यक आहे ?’, हे तो सहजतेने साधकांना सुचवतो.

२. त्याचे सेवेचे नियोजन, तळमळ आणि तत्परता चांगली असल्याने तो त्याच्या सेवा सांभाळून इतरांसाठीही वेळ देऊ शकतो.

३. सहजता

समन्वय करतांना आणि सत्संग घेतांना तो सहज असतो. त्याच्यातील नम्रता आणि इतरांना सहजतेने साहाय्य करण्याची वृत्ती सर्वांना आवडते.

४. अहं अल्प

एखाद्या विषयाचे ज्ञान असलेल्या साधकांशी बोलतांना कधी कधी ‘ते आपल्याला शिकवत आहेत’, असे वाटते; पण प्रदीपशी बोलतांना असे जाणवत नाही.’ (नोव्हेंबर २०२१)

कु. सुप्रिया टोणपे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. सेवेत साहाय्य केल्यामुळे आधार वाटणे

‘वर्ष २०२० मध्ये ‘ऑनलाईन’ अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशना’साठी आपण नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) प्रथमच वापरणार होतो. तिचा अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे अगदी अल्प कालावधी होता; पण प्रदीपने मला प्रत्येक टप्प्याला समजून घेऊन ती प्रणाली पडताळण्यासाठी (टेस्टिंगसाठी) वेळोवेळी साहाय्य केले. यासाठी २५० साधकांना एकाच वेळी जोडून पडताळणी (टेस्टिंग) केल्याने ‘सॉफ्टवेअर’ अंतिम करण्यास साहाय्य झाले. त्यामुळे साधकांमध्ये ‘आपण ते वापरू शकतो’, असा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी ते वापरले. त्यामुळे मला प्रदीपचा आधार वाटला.

२. गुरुकार्याची तळमळ

या ‘सॉफ्टवेअर’साठी अर्पण स्वरूपात मूल्य देण्याविषयी त्याने मला त्या ‘सॉफ्टवेअर’च्या आस्थापनात काम करणार्‍या माझ्या जुन्या सहकार्‍यांना विचारण्यास सुचवले. त्याप्रमाणे मी त्यांना विचारल्यावर त्यांनी अर्पणही दिले.’ (नोव्हेंबर २०२१)

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

१. ‘दादा नेहमी आनंदी आणि उत्साही असतो.

२. ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी तळमळ असणे

तो सर्व साधकांकडून ‘गुरूंना अपेक्षित आणि आवडेल’, अशी सेवा होण्यासाठी सर्वांना आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन देतो. तो साधकांना ध्येय ठेवून सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देतो. ‘सेवेतून साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असे त्याला वाटते.

३. साधकांचा विचार प्राधान्याने केल्याने समष्टीचे मन जिंकणे

तो गुरुदेवांप्रमाणे सर्वांत आधी साधकांचा, त्यानंतर सेवेचा आणि शेवटी कार्याचा विचार करतो. त्यामुळे तो समष्टीचे मन जिंकतो.

४. साधकांना सेवेत आणि साधनेत साहाय्य करणे

तो सर्व सेवा स्वतः न करता अन्य साधकांना सेवा देऊन त्यांना सेवेच्या पुढच्या टप्प्यात नेण्याचा प्रयत्न करतो. तो सेवेचे महत्त्व आणि गांभीर्य साधकांच्या मनावर बिंबवतो. कुणाकडून सेवा होत नसल्यास त्यांच्या अडचणी जाणून घेऊन दादा त्यांना साहाय्य करतो. दादा त्यांना मनाच्या अडथळ्यांवर मात करण्यास सांगतो. त्यातूनही साधकांकडून सेवा होत नसल्यास ती सेवा आपले दायित्व म्हणून तो स्वतः पूर्ण करतो.

५. दादा गुरुसेवेसाठी बुद्धीचा आणि तंत्रज्ञानाचा अचूक उपयोग करतो.

६. तो प्रत्येक कृती ‘सत्यं, शिवं, सुंदरम् ।’ करण्याचा प्रयत्न करतो.

७. इतरांना महत्त्व देणे

दादा ‘वेळेचे पालन करणे, सेवेची घडी बसवणे, साधकांचे कौतुक करणे, त्यांच्याकडून शिकण्याचा स्थितीत रहाणे’ इत्यादी गोष्टी करतो, तरीही कर्तेपणा कधीच स्वतःकडे घेत नाही. तो इतरांना महत्त्व देऊन त्यांना पुढाकार घेण्यास शिकवतो आणि चांगल्या गोष्टीचे श्रेय इतरांना देतो.’ (१६.४.२०२१)

सायली जाधव, पुणे आणि सौ. नेहाली शिंपी, ठाणे

परात्पर गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणे

‘प्रदीपदादाची परात्पर गुरुदेवांवर दृढ श्रद्धा आहे. कोणतीही कठीण परिस्थिती किंवा प्रसंग असला, तरी ‘परात्पर गुरुदेव आहेत ना ! तेच सर्व करवून घेणार’, असा त्याचा भाव असतो.’ (नोव्हेंबर २०२१)

सौ. नेहाली शिंपी, ठाणे

१. ‘संत जे काही सांगतात, त्याचे तंतोतंत पालन करण्याची दादाची धडपड असते.

२. ‘प्रत्येक परिस्थितीत आपण कसे असायला हवे होते ?’, हे दादा मला नेहमी योग्य शब्दांत सांगतो. त्यामुळे ‘सेवेचे प्राधान्य कसे ठरवायचे आणि विचारून कृती कशी करायची ?’, हे मला त्याच्याकडून शिकायला मिळाले.

३. स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ

आरंभी दादाशी जवळीक नसल्याने मला त्याच्याशी बोलण्याचा ताण यायचा; पण दादानेच सहजतेने बोलून जवळीक निर्माण झाली. एकदा दादाला मी सांगितले, ‘‘तू इतर साधकांना जसे साहाय्य करतो, तसे मलासुद्धा करत जा.’’ तेव्हा त्या सूत्राला त्याने पुष्कळ गांभीर्याने घेतले आणि त्याविषयीच्या प्रयत्नांच्या संदर्भात मला विचारले.

४. ‘प्रदीप’ या नावाचा अर्थ देवाने सुचवलेला अर्थ

प्र – प्रत्येक परिस्थिती स्वीकारणारा.

दि – दिव्याप्रमाणे उजळणारा.

प – परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करणारा.’

(नोव्हेंबर २०२१)


चि.सौ.कां. प्रियांका जगताप यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि.सौ.कां. प्रियांका जगताप

श्री. जयवंत आणि सौ. ज्योत्स्ना जगताप (वडील अन् आई) अन् श्री. शुभम् जगताप (भाऊ), फोंडा, गोवा.

१. नीटनेटकेपणा

‘प्रियांका तिच्या सर्व वस्तू नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवते. तिने कपड्यांच्या घड्या घातल्यावर त्यांकडे बघत रहावेसे वाटते. त्यांतून चांगली स्पंदने येतात.

२. सहजता आणि मनमोकळेपणा

ती गेल्या अनेक वर्षांपासून आश्रमात राहून साधना करत आहे, तरीही घरी आल्यावर किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्यावर ती त्या वातावरणाशी लगेच जुळवून घेते. ती सर्वांशी मनमोकळेपणाने आणि सहजतेने वागते. नातेवाइकांनाही तिचे पुष्कळ कौतुक वाटते.

३. परेच्छेने वागणे

आम्ही प्रियांकाच्या लग्नाची खरेदी करायला गेलो होतो. तेव्हा ती आम्हाला विचारून आमच्या आवडीनुसार प्रत्येक गोष्ट निवडत होती. त्यात तिची स्वतःची आवड-नावड काहीच नव्हती.

४. नियोजनकौशल्य आणि काटकसरीपणा

आम्ही खरेदीला जाण्यापूर्वी तिने ‘कोणकोणत्या वस्तू किती प्रमाणात घ्यायच्या ?’, याचे नियोजन केले होते. खरेदी करतांना ‘आवश्यक तेवढ्याच वस्तू घेऊन जेवढी काटकसर करता येईल, तेवढी करावी’, असा तिचा विचार होता.

५. प्रत्येक गोष्टीकडे साधनेच्या दृष्टीने पहाणे

‘बाहेरून चांगले दिसण्यापेक्षा आपण आतून चांगले, म्हणजे गुरुदेवांना अपेक्षित असे असायला पाहिजे’, हा एकच विचार तिच्या मनात असतो. यातून ‘लग्नाची सिद्धता करतांनाही ती त्याकडे स्वतःची साधना म्हणूनच बघत आहे’, असे आमच्या लक्षात आले. ‘एवढ्या लहान वयात तिला हे जमत आहे’, ही गुरुदेवांची तिच्यावर झालेली अपार कृपाच आहे. ‘मायेतील गोष्टी करत असतांनाही त्यांतून विरक्त कसे रहायचे ?’, हे आम्हाला तिच्याकडून शिकायला मिळाले.’ (१९.११.२०२१)

साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये सौ. स्नेहा शिंदे आणि श्री. राजेश दोंतुल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. प्रेमभाव

‘मध्यंतरी प्रियांकाताईला एक सेवा लवकर पूर्ण करायची होती. त्या कालावधीत तिला थकवा होता. त्या वेळी तिच्या खोलीतील साधिकेला ताप आला होता. मध्यरात्री त्या साधिकेला काहीतरी खाण्याची इच्छा झाली; म्हणून त्या साधिकेने ‘रात्री महाप्रसादाला ‘सूप’ होते. ते गरम करून आणशील का ?’, असे प्रियांकाताईला विचारले. तेव्हा ताईने त्या साधिकेला टोमॅटोचे ‘सूप’ नव्याने बनवून दिले.

२. वस्तूंप्रती कृतज्ञताभाव

गुरूंनी दिलेल्या प्रत्येक वस्तूविषयी तिच्यात कृतज्ञताभाव जाणवतो. ‘गुरूंनी दिलेल्या प्रत्येक वस्तूचा जपून आणि परिपूर्ण वापर कसा होईल ? देवाला अपेक्षित अशी ती वस्तू कशी सांभाळता येईल ?’, यासाठी तिचे प्रयत्न असतात.

‘गुरूंनी प्रियांकाताईच्या समवेत सेवा करण्याची आणि शिकण्याची संधी दिली’, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. ‘तिची लवकर आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, हीच गुरुचरणी भावपूर्ण प्रार्थना !’ (२०.११.२०२१)

सौ. सुमुखी आठवले आणि कु. मानसी अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

१. ‘प्रियांकाचा तोंडवळा नेहमी प्रसन्न आणि हसतमुख असतो. तिचे रहाणीमान साधे आहे.

२. सेवाभाव

अ. कोणतीही सेवा करण्यासाठी तिच्या मनाची सिद्धता असते. सेवेसाठी रात्री जागरण करावे लागणार असले, तरीही प्रियांका ती सेवा स्वीकारते.

आ. एखादी सेवा दिल्यानंतर ती कितीही थकली असली, तरीही देवाचे साहाय्य घेऊन ती सेवा पूर्ण करते. ती स्वतःच्या देहाची चिंता न करता नेहमी झोकून देऊन सेवा करते.

इ. ती कधीही कुठल्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नाही. इतरांना सेवेत साहाय्य करण्यास ती सदैव तत्पर असते.

(२०.११.२०२१)

कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘श्री गुरूंच्या कृपेने मला कु. प्रियांकाच्या समवेत काही वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. एकत्र सेवा करतांना ‘आम्ही केव्हा एकमेकींच्या घनिष्ठ आध्यात्मिक मैत्रिणी झालो ?’, हे आम्हालाही कळले नाही. त्या कालावधीत मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. कौतुकाची अपेक्षा नसणे

प्रियांकामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी पुष्कळ प्रेम आहे. ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी आपण झोकून देऊन कार्य करावे; परंतु आपल्या कार्याचे कुठे कौतुक होऊ नये. केवळ गुरूंसाठी करत रहावे’, असे तिला वाटते.

२. स्वभावदोषांमुळे मनाचा संघर्ष होत असतांना ‘भाव अन् तळमळ’ या गुणांच्या आधारे देवाचे साहाय्य घेऊन संघर्षावर मात करणे

पूर्वी मी आणि प्रियांका, आम्ही दोघी सेवा करत असतांना आमच्याकडून सेवेत काही चुका झाल्यास उत्तरदायी साधक आम्हाला आमच्यातील स्वभावदोष अन् अहं यांची जाणीव करून द्यायचे. तेव्हा ‘स्वतःचेच योग्य वाटणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे, प्रतिमा जपणे’, यांसारख्या अहंच्या पैलूंमुळे काही वेळा चुका स्वीकारतांना आमच्या मनाचा संघर्ष होत असे. खरेतर भगवंत आम्हाला साधनेत पुढे नेण्यासाठीच ही सारी लीला घडवत होता. त्या कालावधीत ‘भाव आणि तळमळ’ या गुणांच्या आधारे देवाचे साहाय्य घेऊन प्रियांकाने या संघर्षावर मात करण्याचा प्रयत्न केला.

३. भाव

३ अ. संतांप्रती भाव : एकदा प्रियांकाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना मर्दन करण्याची सेवा मिळाली. ‘ती सेवा परिपूर्ण व्हावी’, यासाठी प्रियांका स्वतःला विसरून तळमळीने प्रयत्न करत असे. जेव्हा तिला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा सहवास मिळतो, ती ‘त्यांच्याकडून कसे शिकता येईल ?’, यासाठी प्रयत्न करते.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : अनेक वर्षांपूर्वी आश्रमात एक संत आले होते. त्या वेळी प्रियांका सहसाधिकांसह त्यांच्या दर्शनासाठी गेली असता त्या साधिकांची ओळख करून देतांना परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘‘हे सर्व मोक्षाला जाणारे !’’ ‘हे वाक्य अनेक वर्षांनंतर आजही प्रियांकाच्या स्मरणात आहे’, हे विशेष आहे. आजही हे वाक्य बोलून दाखवतांना तिची भावजागृती होते आणि ती एका वेगळ्याच भावविश्वात जाते.

३ इ. ‘देव मला आवश्यक त्या वेळी आवश्यक ते सर्व शिकवणार आहे’, असा तिचा भाव असतो.

प्रियांका, गुरुप्रिया तू व्हावेस ।

भाव अंतरी असे अपार, यत्न करी होण्या हरिप्रिया (टीप १) ।
गुरुसेवा अभ्यासपूर्ण करण्या, झटतसे आमची प्रियांका ।। १ ।।

वरदान लाभले क्षात्रतेजाचे, परात्पर गुरूंच्या कृपेने ते उमगले ।
भाग्य लाभले श्री गुरूंच्या (टीप २) सहवासाचे, दिले तयांनी ध्येय हिंदु राष्ट्राचे ।। २ ।।

व्यष्टी-समष्टीची जडण-घडण होतांना आले आता दायित्व निराळे ।
प्रियांकाच्या आध्यात्मिक मार्गाला भगवंताने सहजीवन जोडले प्रदीप यांचे ।। ३ ।।

असे जरी हा उंबरठा निराळा, याही पुढे आहे तोच प्रवास ईश्वरप्राप्तीचा ।
गुरुतत्त्व अनुभवत करावास तू आरंभ या नवीन साधनाप्रवासाचा ।। ४ ।।

तुझ्या आध्यात्मिक उन्नतीस आवश्यक जे, ते सारे तुला मिळावे ।
भक्ती वाढूनी तुझी, समष्टीसाठी तू घडावे, गुरुप्रिया तू व्हावे ।। ५ ।।

टीप १ – श्रीहरीला प्रिय असलेली

टीप २ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या

‘हे गुरुराया, ‘केवळ तुमच्या कृपेमुळेच मला प्रियांकासारखी आध्यात्मिक मैत्रीण लाभली’, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. प्रियांकाचा जन्म आपल्या चरणी येण्यासाठी आणि श्री गुरूंचे समष्टी कार्य करण्यासाठीच झाला आहे. ‘आपणच तिच्याकडून तिची या पुढील साधना करवून घ्या’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’ (१९.११.२०२१)

कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. परिस्थिती स्वीकारणे

‘कोरोना महामारीच्या काळात आश्रमातील साधकसंख्या अल्प असल्यामुळे साधकांना अनेक सेवा असायच्या. अशा वेळी प्रियांकाताई तिची नियोजित सेवा रात्री उशिरापर्यंत करायची. अनेक वेळा तिला तिच्या नियोजित सेवेसह अनेक सेवा असायच्या. त्या सेवांचे नियोजन करून ती येणार्‍या परिस्थितीला सामोरे जायची. यावरून ‘परिस्थितीला देव मानून शरण गेल्यानंतर त्या परिस्थितीतून आनंद मिळतो’, हे मला शिकता आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणे

प्रियांकाताईच्या आजोबांची प्रकृती बरी नसतांना ती घरी रहायला गेली होती. आश्रमात परत आल्यानंतर तिने मला घरी घडलेल्या सगळ्या प्रसंगांविषयी सांगितले. तेव्हा ती प्रत्येक प्रसंगाच्या शेवटी ‘श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) कृपेमुळेच झाले. त्यांनीच मला प्रत्येक क्षणी साहाय्य केले आणि ते सतत माझ्या समवेत असल्याची जाणीवही ते मला करवून देत होते’, असे मला सांगत होती.

‘प्रियांकाताईमधील गुणांची वृद्धी होऊ दे आणि ‘मलाही तिच्याप्रमाणे प्रयत्न करता येऊ देत’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’ (१५.११.२०२१)