कोरोनाच्या नव्या अधिक घातक ‘ओमिक्रॉन’ प्रकारामुळे पुन्हा भीतीचे वातावरण !

नवीन कोविड प्रकार ‘ओमिक्रॉन’

नवी देहली – कोरोना विषाणूचा आणखी एका घातक प्रकार समोर आल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम कोरोनाचा हा प्रकार आढळून आला असून याला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. भारताने १२ देशांतून येणार्‍या प्रवाशांना विमानतळांवर चाचणी करणे बंधनकारक केले आहे, तर अमेरिकेने दक्षिण आफ्रिका खंडातून येणार्‍या ८ देशांतील प्रवाशांना बंदी घालण्याची सिद्धता केली आहे.

१. ‘ओमिक्रॉन’ हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेच्या बोत्सवाना येथे ११ नोव्हेंबर या दिवशी आढळून आला होता. त्यानंतर हाँगकाँग, इस्रायल, बेल्जियम आदी देशांतही आढळून आला. आतापर्यंतच्या कोरोनाच्या अन्य प्रकारांच्या तुलनेत ओमिक्रॉनचा प्रसार होण्याची गती अत्याधिक आहे.

२. ओमिक्रॉनवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक आयोजित केली होती. तसेच देशातील गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतही सतर्कता बागळण्यात येत आहे. येथेही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बैठका आयोजित करून आढावा कोरोनाच्या सद्यःस्थितीचा घेतला.

३. मुंबईत आफ्रिका खंडातून येणार्‍या प्रवाशांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. गुजरात सरकारने युरोप आणि अन्य काही देशांतील प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोनाची ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणी करणे बंधनकारक केले आहे.

४. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत, त्या देशांतून येणार्‍या विमानांवर बंदी घालावी’, अशी मागणी केली आहे.