५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वेेंगुर्ला (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. पूर्णानंद महेश जुवलेकर (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. पूर्णानंद महेश जुवलेकर हा या पिढीतील एक आहे !

कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (२८.११.२०२१) या दिवशी चि. पूर्णानंद महेश जुवलेकर याचा तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि त्याच्या जन्मानंतर त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. पूर्णानंद जुवलेकर

चि. पूर्णानंद महेश जुवलेकर याला तिसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. लग्नाला १२ वर्षे होऊनही मूल न होणे; पण त्याविषयी वाईट न वाटणे : ‘आमच्या लग्नाला १२ वर्षे झाली; पण या १२ वर्षांत ‘मूल व्हावे’, यासाठी आम्ही विशेष काहीच प्रयत्न केले नाहीत. मला वाटायचे, ‘मूल व्हायचे असेल, तर परात्पर गुरुदेवांच्या कृपेने होईल.’ त्यामुळे मला मूल नसल्याविषयी वाईट वाटत नसे.

२. गर्भधारणा : ऑगस्ट २०१७ मध्ये आम्ही सेवेसाठी देवद आश्रमात गेलो. मे २०१८ मध्ये माझी प्रकृती बरी नसल्याने मी देवद आश्रमातून वेंगुर्ला (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे घरी आले. आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर मला दिवस गेल्याचे आणि गर्भधारणा होऊन २ मास झाल्याचे कळले.

३. गर्भारपण

३ अ. नामजप आणि प्रार्थना करणे अन् रामरक्षा म्हणणे : गर्भारपणाच्या वेळी मी ‘कुडाळ सेवाकेंद्रात २ घंटे नामजप करणे, पोटावर हात ठेवून ‘रामरक्षा’ म्हणणे’, असे प्रयत्न करत असे. ‘सद्गुरु सत्यवान कदम यांचे चैतन्य मला आणि बाळाला मिळावे’, यासाठी मी प्रतिदिन प्रार्थना करत असे.

सौ. श्रद्धा जुवलेकर

३ आ. ३ ते ५ मास

३ आ १. ‘उशिरा गर्भधारणा झाल्याने बाळात व्यंग असू शकते’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे; परंतु वैद्यकीय चाचण्या केल्यावर बाळात कोणतेही व्यंग नसल्याचे कळणे : आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुमचे वय जास्त आहे आणि लग्नानंतर १२ वर्षांनी गर्भधारणा झाल्यामुळे जन्माला येणार्‍या बाळात व्यंग असू शकते.’’ त्यांनी सांगितल्यानुसार तिसर्‍या मासात माझ्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सर्व चाचण्यांच्या अहवालानुसार बाळामध्ये कुठलेही व्यंग नव्हते. ‘परात्पर गुरूंनी आम्हाला हे बाळ दिले आहे. त्यामुळे त्याच्यात कोणतेही व्यंग नसणारच !’, अशी आम्हाला निश्चिती होती.

३ आ २. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘देव तुझ्या पाठीशी असल्याने काळजी करू नकोस’, असे सांगितल्यावर काळजी दूर होणे : त्या वेळी माझी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याशी सिंधुदुर्ग येथे भेट झाली. त्यांनी माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि त्या मला म्हणाल्या, ‘‘तू कसलीच काळजी करू नकोस. देव तुझ्या पाठीशी आहे.’’ ते ऐकल्यावर क्षणार्धात माझी काळजी दूर झाली. या प्रसंगात मला सद्गुरु स्वातीताईंची प्रीती अनुभवता आली. त्यानंतर ‘हे बाळ परात्पर गुरूंचेच आहे. आपण निमित्तमात्र आहोत. परात्पर गुरुदेवच त्याचे रक्षण करणार आहेत’, असे वाटून माझी भावजागृती व्हायची. पूर्वी मला तपासणीसाठी जातांना ताण यायचा; पण सद्गुरु स्वातीताईंनी ‘देव तुझ्या पाठीशी आहे’, असे सांगितल्यानंतर ‘आधुनिक वैद्यही माझ्याशी प्रेमाने वागू लागले आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

३ आ ३. साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी केलेला प्रीतीचा वर्षाव ! : मी कुडाळ सेवाकेंद्रात रहायला गेले. त्या वेळी ‘साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेव माझ्यावर प्रीतीचा वर्षाव करत आहेत’, असे मला जाणवले. सेवाकेंद्रातील साधकांनी माझी सर्व प्रकारे काळजी घेतली.

३ आ ४. प्रसुती तज्ञांनी ‘विश्रांती घ्यावी लागेल’, असे सांगणे आणि गुरुकृपेने शेवटपर्यंत कोणताही त्रास न होणे : चौथ्या मासात प्रसुती तज्ञांनी मला सांगितले, ‘‘तुझा रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे तुला विश्रांती (बेड रेस्ट) घ्यावी लागेल, अशी तुझी स्थिती आहे’’; पण परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला शेवटपर्यंत कसलाच त्रास झाला नाही.

३ आ ५. मनात नकारात्मक विचार आल्यावर आणि संतांच्या सत्संगात पोटातील बाळाची हालचाल जोरात होणे : सहावा मास लागल्यावर मला पोटातील बाळाची हालचाल जाणवू लागली. जेव्हा माझ्या मनात नकारात्मक विचार यायचे, तेव्हा पोटातील बाळाची हालचाल जोरात होत असे. त्या माध्यमातून ‘बाळ जणू मला सकारात्मक रहाण्यास सांगत आहे’, असे मला जाणवायचे. बाळाला सद्गुरु सत्यवान कदम यांचेही चैतन्य मिळत असे. जेव्हा सद्गुरु स्वातीताई सेवाकेंद्रात येत असत, तेव्हा बाळाची हालचाल जोरात होत असल्याचे मला जाणवत असे.

३ आ ६. वैद्य सुविनय दामले यांनी ‘सेवाकेंद्रात रहात असल्याने वेगळे गर्भसंस्कार करण्याची आवश्यकता नाही’, असे सांगितल्यावर कृतज्ञता वाटणे : मी वैद्य सुविनय दामले यांना गर्भसंस्कार करण्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तू सेवाकेंद्रात रहात आहेस. तेथे तुझ्यावर गर्भसंस्कार होत आहेत. त्यामुळे तुला वेगळे गर्भसंस्कार करण्याची आवश्यकता नाही.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझी भावजागृती झाली.

३ इ. सातव्या मासात माझा ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्या वेळी मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.

३ ई. आठवा मास : सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांच्या संतसोहळा संगणकीय प्रणालीद्वारे पहातांना ‘पोटातील बाळ आनंदाने फिरत आहे’, असे मला जाणवले.

३ उ. नववा मास

३ उ १. गर्भारपणात मी सेवाकेंद्रात राहिल्याने मला माझ्या प्रसुतीविषयी किंचित्ही काळजी वाटली नाही.

३ उ २. बाळ पायाळू असल्याने शस्त्रकर्म करून प्रसुती करण्याचे प्रसुती तज्ञांनी ठरवणे; परंतु दुसर्‍या दिवशी तपासणीच्या वेळी बाळाने स्थिती पालटली असून ते सरळ झाल्याचे आढळल्याने सर्वांना आश्चर्य वाटणे : सहाव्या मासापासून प्रसुती तज्ञ मला सांगत होत्या, ‘‘बाळ पायाळू आहे.’’ मला नववा मास लागल्यावरही बाळ त्याच स्थितीत होते. तेव्हा प्रसुती तज्ञ मला म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत बाळाची स्थिती पालटलेली नाही आणि आता पालटण्याची शक्यताही नाही. आपण ३ – ४ दिवसांत शस्त्रकर्म करून तुझी प्रसुती करूया. उद्या प्रसुतीचा दिनांक ठरवूया.’’ दुसर्‍या दिवशी मी तपासणीसाठी गेल्यावर बाळाने स्थिती पालटली होती. ते सरळ झाले होते. याचे प्रसुती तज्ञांनाही आश्चर्य वाटले. ही केवळ परात्पर गुरुदेवांची कृपा होती.

३ उ ३. ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी ‘प्रसुती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल’, असे सांगणे आणि गुरुकृपेने तसेच घडणे : मला सहावा मास चालू असतांना ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी ‘तुझी प्रसुती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल’, असे सांगितले होते. बाळाचा जन्म डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच व्हायचा होता; म्हणून ‘बाळाने स्वतःची स्थिती पालटली’, असे मला जाणवले. शस्त्रकर्म करून प्रसुती करण्याचे ठरल्यावर मी सौ. प्राजक्ता जोशी यांना प्रसुतीचा दिनांक आणि वेळ विचारली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या वेळेत शस्त्रकर्म करण्यात काही अडचणी आल्या; परंतु बाळाचा जन्म सौ. जोशी यांनी सांगितलेल्या वेळेत झाला. हे सर्व गुरुदेवांनीच जुळवून आणले.

३ उ ४. गुरुकृपेने बाळाच्या जन्मापर्यंत पती-पत्नी दोघेही सेवारत राहू शकणे : आरंभीपासून मला ‘मी प्रसुतीसाठी जाईपर्यंत आमच्याकडून सेवा व्हायला हवी’, असे वाटायचे. त्याप्रमाणे प्रसुतीच्या आदल्या रात्रीपर्यंत आम्हा दोघांनाही सेवा करता आली. प्रसुतीच्या आदल्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत मला सेवाकेंद्रात सेवा करायला मिळाली आणि सकाळी ७.३० वाजता मी प्रसुतीसाठी रुग्णालयात गेले. सकाळी ७.३० वाजता सेवाकेंद्रातून निघतांना यजमानांना ‘कुडाळमध्ये शक्तीरथ आला असून तो चालू होत नाही’, असा भ्रमणभाष आला. तेव्हा मला रुग्णालयात भरती करून ते थेट तिकडे सेवेसाठी गेले. ‘परात्पर गुरुदेवांनी आमच्या दोघांकडूनही बाळ जन्माला येईपर्यंत सेवा करून घेतली’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

४. बाळाचा जन्म झाल्यावर ‘बाळ परात्पर गुरुदेवांच्याच कृपेने आहे’, असे वाटणे : प्रसुतीच्या वेळी माझा नामजप चालू होता. मी देवाला ‘ही सर्व प्रक्रिया माझ्याकडून साधना म्हणून होऊ दे’, अशी प्रार्थना करत होते. प्रसुती तज्ञांनी मला मुलगा झाल्याचे सांगितल्यावर ‘हे बाळ परात्पर गुरुदेवांच्याच कृपेने आहे’, असा माझ्या मनात विचार आला.

५. जन्मानंतर

५ अ. जन्म ते दीड वर्ष

५ अ १. देवाच्या खोलीत नेल्यावर बाळाचे रडणे थांबणे आणि बाहेर आल्यावर बाळ पुन्हा रडणे : बाळ एक मासाचे असतांना एकदा रात्री ते फार रडत होते. सर्व उपाय करूनही त्याचे रडणे थांबत नव्हते; म्हणून मी त्याला देवघरात घेऊन गेले. तेव्हा त्याचे रडणे थांबले. त्यानंतर मी त्याला घेऊन बाहेर आल्यावर पुन्हा बाळ रडायला लागले. देवघरात नेल्यावर बाळाचे रडणे थांबायचे आणि बाहेर आल्यावर बाळ रडायचे. असे ५ – ६ वेळा झाले.

५ अ २. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी बाळाला घेतल्यानंतर त्याचे गुदमरून रडणे थांबणे : बाळ रडायला लागले की, त्याला गुदमरल्यासारखे होऊन ते रडायचे. बाळ दीड मासाचे असतांना सद्गुरु स्वातीताई बाळाला बघायला आल्या. तेव्हा बाळ झोपले होते. सद्गुरु ताईंनी बाळाला उचलून घेतले आणि त्याच्या गालावरून हात फिरवला. त्या दिवसापासून बाळाचे गुदमरल्यासारखे होऊन रडणे थांबले.

५ अ ३. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या पादुका-प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी पूर्णानंद शांत आणि आनंदी असणे अन् झोपेतही तो सत्संग अनुभवत असल्याचे जाणवणे : १२.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरुदेवांचा पादुका-प्रतिष्ठापना सोहळा होता. संगणकीय प्रणालीद्वारे होणारा हा सोहळा पहाण्यासाठी मला जायचे होते; पण ‘पूर्णानंद शांत बसेल का ?’, असे मला वाटत होते. पूर्णानंद संपूर्ण कार्यक्रमात शांत आणि आनंदी होता. काही वेळ तो झोपला होता. तेव्हाही ‘तो सत्संग अनुभवत आहे’, असे मला वाटले.

५ अ ४. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या संदर्भातील लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्याचे पूर्णानंदला सांगितल्यावर त्याने नमस्काराची मुद्रा करून दैनिकाकडे पहाणे : सद्गुरु स्वातीताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होळी पौर्णिमेला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्याविषयीचा लेख प्रसिद्ध झाला होता. मी तो वाचत असतांना पूर्णानंद झोपून उठला. मी त्याला मांडीवर घेतले आणि त्याला म्हणाले, ‘‘आज सद्गुरु स्वातीताईंचा वाढदिवस आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्या संदर्भातील लिखाण प्रसिद्ध झाले आहे.’’ त्या क्षणी त्याने आपले दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेप्रमाणे जवळ घेतले आणि काही वेळ तो दैनिक ‘सनातन प्रभात’कडे पहात होता. हे पाहून आम्हाला फारच आश्चर्य वाटले.

५ अ ५. पूर्णानंद किरकिर करत असतांना देवाला प्रार्थना केल्यावर पूर्णानंदच्या तोंडवळ्यावर दैवी कण दिसणे, ‘परात्पर गुरुदेव समवेत आहेत’, असे जाणवणे आणि त्यानंतर त्याची किरकिर थांबणे : पूर्णानंद ५ मासांचा असतांना एकदा रात्री तो सतत किरकिर करत होता. मी घरात एकटी होते. मला काहीच सुचत नव्हते. मी देवाला प्रार्थना केली. तेवढ्यात मला पूर्णानंदच्या तोंडवळ्यावर ३ दैवी कण दिसले. ते पाहून मला ‘परात्पर गुरुदेव आमच्या समवेत आहेत’, याची जाणीव झाली आणि त्यानंतर १० मिनिटांनी पूर्णानंदची किरकिर थांबली.

५ अ ६. संध्याकाळी मी देवाजवळ दिवा लावायला गेल्यावर पूर्णानंद कुठेही असला आणि काहीही करत असला, तरी तो लगेच देव्हार्‍याजवळ येऊन उभा रहातो.

५ अ ७. सद्गुरु सत्यवान कदम यांनी पूर्णानंदला उचलून घेतल्यानंतर त्याचे रात्रीच्या वेळी रडणे थांबणे : तो ६ मासांचा असतांना एकदा दोन रात्री तो सतत रडत होता. तिसर्‍या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम पूर्णानंदला बघायला आमच्या घरी आले. त्या दिवशी दुपारपासून पूर्णानंद पुष्कळ आनंदी होता. सद्गुरु दादांनी उचलून घेतल्यावर त्याला आनंद झाला. त्यानंतर तो रात्रीच्या वेळी पुन्हा रडला नाही.

५ अ ८. पूर्णानंदला सात्त्विक श्री गणेशमूर्ती आणि इतर मूर्ती यांतील भेद लक्षात येणे : पूर्णानंद ९ मासांचा असतांना श्री गणेशचतुर्थीच्या वेळी आमच्या घरी बाहेरील मूर्तीकाराने बनवलेली श्री गणेशमूर्ती पूजली होती. पूर्णानंद कधीही त्या मूर्तीकडे फारसे पहात नसे. ‘तो असे का करतो ?’, असा मला प्रश्न पडायचा. गणपति बसवल्यावर चौथ्या दिवशी आम्ही त्याला घेऊन माझ्या माहेरी सावंतवाडीला गेलो. तिथे सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीचे पूजन केले होते. तिथे गेल्यापासून पूर्णानंद पुनःपुन्हा आणि बराच वेळ त्या श्री गणेशमूर्तीकडे पहायचा. यावरून पूर्णानंदलाही सात्त्विक श्री गणेशमूर्ती आणि इतर मूर्ती यांतील भेद जाणवल्याचे माझ्या लक्षात आले.

५ अ ९. कुलदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर रात्री पूर्णानंदच्या पाठीवर दैवी कण दिसणे : पूर्णानंद १० मासांचा असतांना आम्ही त्याला घेऊन आमच्या कुलदेवतेच्या दर्शनास गेलो होतो. त्या रात्री मला त्याच्या पाठीवर दैवी कण आढळले.

५ अ १०. झोपेत असतांनाही सद्गुरु सत्यवान कदम यांना दोन्ही हात जोडून नमस्कार करणे : एकदा आमच्याकडे सद्गुरु सत्यवान कदम आले होते. त्या वेळी पूर्णानंद झोपला होता. त्याला त्यांच्या सत्संगातील चैतन्य मिळावे; म्हणून मी त्याला मांडीवर घेऊन बसले होते. काही वेळाने सद्गुरु सत्यवानदादा जायला निघाले; म्हणून मी त्याला ‘त्यांना नमस्कार कर’, असे म्हटले. तेव्हा त्याने झोपेतच दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला.

६. देवद आश्रमात गेल्यावर पूर्णानंदविषयी जाणवलेली सूत्रे

६ अ. आम्ही नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याला घेऊन देवद आश्रमात गेलो होतो. त्या वेळी आमचा १२ घंटे प्रवास झाला होता, तरी तो आश्रमात गेल्यावर उत्साही होता.

६ आ. ‘आश्रमातील सर्व संत आणि साधक त्याच्या ओळखीचेच आहेत’, असा तो वावरत होता.

६ इ. तो सर्वांमध्ये मिसळत होता आणि आश्रमात पुष्कळ आनंदी होता.

६ ई. देवद आश्रमात असतांना पहिले दात येणे; परंतु कोणताही त्रास न होणे : तो १ वर्षाचा झाला, तरी त्याला एकही दात आला नव्हता. तो देवद आश्रमात असतांना त्याला एकदम ४ दात आले. त्या वेळी त्याला एक दिवस ताप आला. त्याला इतर कोणताच त्रास झाला नाही.

६ उ. संतांविषयीची ओढ : देवद आश्रमात असतांना पू. भाऊ परब (सनातनचे २६ वे संत पू. भाऊ (सदाशिव) परब (वय ८० वर्षे)) कोल्हापूर सेवाकेंद्रात जाण्यासाठी निघाले होते. त्या वेळी त्यांनी पूर्णानंदला उचलून घेतले. पूर्णानंद त्यांच्याकडून कुठल्याही साधकाकडे जात नव्हता. पू. काकांना निघण्यास उशीर होत होता. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्याला घेतले, तेव्हा तो लगेच त्यांच्याकडे गेला.’

‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपेमुळे आम्हाला हे बाळ मिळाले आहे. या आपत्काळात तुम्हीच त्याचे रक्षण करा. ‘त्याच्यावर संस्कार कसे करायचे ?’, हे तुम्हीच आम्हाला शिकवा. पूर्णानंदला घडवतांना त्यातून आमचीही साधना होऊ दे. आम्हा सर्वांना आपल्या चरणांशी घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. श्रद्धा महेश जुवलेकर (आई), वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. (१८.२.२०२०)