१. भावी आयुष्याचा चित्रपटच डोळ्यांसमोर उलगडत असल्याचे जाणवणे
‘एके दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या बाबांना प्रसाद पाठवला. ‘‘तुम्ही साधक मुलीला जन्म दिलात, तिला साधना करण्यासाठी आणि आश्रमात रहाण्यासाठी अनुमती दिलीत; म्हणून प्रसाद दिला’’, असे त्यांनी सांगितले. यानंतर साधारणपणे आठवडाभराने मला ‘माझ्या आयुष्यातील एकेक गणिते आपोआप सुटत आहेत’, असे आतूनच वाटू लागले. माझ्या मनावर गेली १८ वर्षे ज्या प्रसंगांचा तीव्र्र ताण होता, त्या विचारांतून परात्पर गुरु डॉक्टरांनी आता मला मुक्त केल्याचे जाणवले. त्यामुळे माझ्या मनावरचा पुष्कळ भार न्यून झाल्याचे जाणवून मला हलकेपणा जाणवला. त्यासह तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे उद्भवणार्या एकटेपणाच्या जाणिवेविषयीही देवाने मला आतून उत्तर देऊन माझ्या मनातील विचार दूर केल्याचे जाणवले. ‘जणू माझ्या भावी आयुष्याचा चित्रपटच डोळ्यांसमोर उलगडत आहे’, असे मला जाणवले. ‘या आयुष्यात मला आता साध्य करण्यासारखे काही राहिलेले नाही. परात्पर गुरु डॉक्टर योग्य वेळी मला आवश्यक ते सर्व देणारच आहेत’, याचीही आतून आपोआप जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त झाली.
२. अपात्र जिवावर केलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त कशी करावी, हे न कळणे
‘परात्पर गुरु डॉक्टर, मनाच्या या जाणिवा पुष्कळ वेगळ्या आहेत. वरील विचार संतांच्या मनात येऊ शकतात; पण माझ्यासारख्या पापी, क्षुद्र आणि साधना नसलेल्या जिवाच्या मनात असे विचार येणे धोकादायक वाटते. गुरुदेवा, मी आयुष्यात प्रथमच असे अनुभवत आहे. तेव्हापासून मनाची स्थिती थोडी आनंददायी आहे. गुरुमाऊली, तुम्ही या अपात्र जिवावर केलेल्या कृपेसाठी तुमच्याप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करू, हेच कळत नाही.
३. साधिकेने परात्पर गुरु डॉक्टरांना केलेली आत्मनिवेदनरूपी प्रार्थना
गुरुदेवा, मी जन्मापासून आतापर्यंत पुष्कळ दुःख भोगले. त्या प्रत्येक दुःखाच्या क्षणी तुम्ही सूक्ष्मातून सातत्याने माझ्या समवेत होता. मी वर्ष २००३ मध्ये साधनेला आरंभ करतांना किंवा एवढ्या वर्षांत कधीही माझ्या मनात ‘मला संस्थेत एखादे पद मिळावे किंवा सुख मिळावे’, अशी किंचितही इच्छा नव्हती. केवळ ‘भावपूर्ण, परिपूर्ण आणि अहंविरहित सेवा करता यावी’, हेच एक ध्येय होते आणि अजूनही आहे. गुरुदेवा, तुमची लीला अगाध आहे. तुमच्या या कृपेसाठी मी कितीही प्रयत्न केले, तरी तुमचे माझ्यावरील ऋण फेडता येणे अशक्यच आहे. तुम्ही मला भावी आयुष्यात जे काही देणार आहात, त्यासाठी मी अजिबात पात्र नाही. मला एवढे मोठे प्रचंड शिवधनुष्य पेलता येणे अशक्यच आहे. गुरुदेवा, ‘मी माझे आयुष्य तुम्हाला समर्पित केले आहे. माझ्या आतापर्यंतच्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक जीवनप्रवासात जसे तुम्ही मला सांभाळलेत, तसे इथून पुढेही सांभाळा. मला या सगळ्यांतून मनाने अलिप्त रहाता येऊन तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करता येऊ दे. तुम्हाला अपेक्षित असलेले ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय मला साध्य करता येऊदे’, अशी तुमच्या पावन चरणी अत्यंत कळकळीची प्रार्थना !
गुरुदेवा, मला तुमच्याविषयी खूप खूप खूप बोलावेसे वाटते, खूप काही लिहावेसे वाटते; पण शब्दही सुचत नाहीत. सगळ्याच गोष्टींना मर्यादा आहेत. तुमचे माहात्म्य मी कधीच जाणू शकणार नाही; कारण त्यासाठी तुमच्याच तोडीचा महात्मा लागणार. मी पामर तुमच्याविषयी काय लिहिणार ? पण माझ्या अंतर्मनातील विचार आपणच जाणू शकता.
प.पू. डॉक्टर, ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय साध्य करता येण्यासाठी मला आध्यात्मिक बळ द्या’, अशी तुमच्या कोमल आणि पावन चरणी अनंत अनंत अनंत वेळा प्रार्थना !’
– एक साधिका, सनातन आश्रम, गोवा. (४.१०.२०२१)