केरळ उच्च न्यायालयाकडून ‘ललित कला अकॅडमी’ला नोटीस

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार दिल्याचे प्रकरण

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’ने हिंदु धर्म, देश आणि गाय यांचा अवमान करणार्‍या एका व्यंगचित्राला २५ सहस्र रुपयांचा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला आहे. याविरोधात केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्यावर न्यायालयाने ‘ललित कला अकॅडमी’ला याविषयी त्यांचे म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली आहे. ‘ललित कला अकॅडमी’ ही संस्था केरळ राज्यातील स्वायत्त सांस्कृतिक संस्था आहे.

याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, हे व्यंगचित्र प्रथमदर्शनी भारताचा अवमान करते. हे व्यंगचित्र अशा वेळी प्रकाशित करण्यात आले होते ज्या वेळी कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे जीव गेले आणि नागरिक मानसिक अन् आर्थिक स्थितीशी संघर्ष करत होते. हे व्यंगचित्र जाणीवपूर्वक केलेली अतिशयोक्ती आहे. सार्वजनिक विकृती निर्माण करण्यासाठी हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे. या संस्थेने व्यंगचित्राला दिलेला पुरस्कार परत घ्यावा.

व्यंगचित्रात काय आहे ?

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे की, कोरोनाविषयी जागतिक संमेलन चालू असून त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, चीन आणि भारत या देशांचे प्रतिनिधी बसले आहेत. त्यात भारताचा प्रतिनिधी म्हणून गाय दाखवण्यात आली आहे. या गायीला भगवे वस्त्र घालण्यात आले आहे. हे पाहून अन्य देशांचे प्रतिनिधी भारताकडे आश्‍चर्याने पहात आहेत. या चित्राला ‘कोविड -१९ इन इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. केरळच्या पोन्नुरुन्नि येथे रहाणार्‍या अनूप राधाकृष्णन् याने हे व्यंगचित्र काढले आहे.