‘एक मूल धोरण’ शिथिल केल्यानंतरही चिनी जनता मूल जन्माला घालण्यास सिद्ध नाहीत !
बीजिंग (चीन) – चीन सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असला, तरी चीनमधील जन्मदर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने घसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. वर्ष २०२० मध्ये चीनमधील जन्मदर प्रती सहस्र लोकांमागे ८.५ इतका नोंदवला गेला आहे, जो वर्ष १९७८ नंतरचा सर्वांत अल्प आहे. ‘द गार्डियन’ वृत्तपत्राने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात हा दावा केला आहे. या अहवालात ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ या चीनच्या सरकारी विभागाच्या आकडेवारीचा संदर्भ देण्यात आला आहे. ‘एक मूल धोरण’ शिथिल केल्यानंतरही चीनमधील लोक आता मुलांना जन्म देण्यास सिद्ध नाहीत. चीनची तरुण लोकसंख्या झपाट्याने अल्प होत असून जन्मदरही अल्प आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या अहवालात बालकांच्या जन्मदरात घट होण्याचे कारण दिलेले नाही; मात्र लोकसंख्याशास्त्रज्ञांनी बाळंतपणाच्या वयातील महिलांची घटती संख्या आणि कुटुंब वाढवण्याच्या वाढत्या व्ययाकडे (खर्चाकडे) लक्ष वेधले आहे.
Chinese birthrate falls to lowest since 1978 https://t.co/269GSmedWt
— The Guardian (@guardian) November 23, 2021