इंडोनेशियातील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रित केला जाणार !

जे जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इस्लामी इंडोनेशियाला शक्य आहे, ते धर्मनिरपेक्षतावादी भारताला का शक्य होत नाही ? – संपादक 

जकार्ता (इंडोनेशिया) – जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये लोकांच्या तक्रारींनंतर ‘मुस्लिम क्लेरिकल कौंसिल’ने मशिदींवरील भोंग्यांचा वापर करण्याविषयीच्या मार्गदर्शिकेची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे मशिदींवरील भोंग्यांच्या आवाज नियंत्रित केला जाणार आहे. इंडोनेशियाची लोकसंख्या २७ कोटी असून यांतील ८० टक्के जनता मुसलमान आहे.

१. इंडोनेशियामध्ये अनुमाने ६ लाख २५ सहस्र मशिदी आहेत. येथील बहुतांश मशिदींवरील भोंग्यांद्वारे अजान ऐकवली जाते. कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याने येथील नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत.

२. ‘वर्ष १९७८ मध्ये देशाच्या धार्मिक प्रकरणांविषयीच्या मंत्रालयाने भोंग्यांच्या संदर्भात मार्गदर्शिका घोषित केली होती. या मार्गदर्शिकेमध्ये वर्तमान स्थितीनुसार पालट करण्याची आवश्यकता आहे’, असे इंडोनेशियाच्या उलेमा कौंसिलने म्हटले आहे. सध्याचे धार्मिक प्रकरणाचे मंत्री याकूत चोलिल कौमास यांनी याचे स्वागत केले आहे.

३. ‘मुस्लिम कौंसिल फतवा कमिशन’चे सचिव मिफ्ताहुल यांनी म्हटले की, भोंग्यांचा नीट वापर केला गेलाच पाहिजे. यात मनमानी करता येणार नाही. आमचा हेतू जरी चांगला असला, तरी अन्य लोकांना याचा त्रास होऊ नये, याचाही विचार केला पाहिजे.

४. या कौंसिलच्या वर्ष २०१७ ते २०२२ या ५ वर्षांच्या मुख्य सूत्रांच्या सूचीमध्ये मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचेही सूत्र आहे. आतापर्यंत ५० सहस्रांहून अधिक मशिदींवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रित करण्यात आला आहे.