मऊ (उत्तरप्रदेश) येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा खंडित अवस्थेत आढळला

मऊ (उत्तरप्रदेश) – येथील सराय लखंसी क्षेत्रातील खानपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा खंडित अवस्थेत आढळल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. २३ नोव्हेंबरला ही घटना घडली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावर विटा फेकण्यात आल्या. त्यामुळे मूर्तीचा चेहरा आणि हात खंडित झाला.

यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रानीपूर मार्ग रोखून धरत या घटनेचा निषेध केला. या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी डॉ. आंबेडकरांचा नवा पुतळा स्थापित केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.