पाकिस्तानकडे देश चालवण्यासाठीही पैसे नाहीत ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती

  • पाककडे देश चालवण्यासाठी पैसे नाहीत; मात्र जिहादी आतंकवाद्यांना पोसण्यासाठी आणि त्यांना शस्त्रास्त्रे देण्यासाठी, सैन्यावर वारेमाप व्यय करण्यासाठी पैसे आहेत, याविषयी इम्रान खान का बोलत नाहीत ? – संपादक
  • पाकला आता कुणी भीक मागूनही पैसे देत नाही. भविष्यात आर्थिक कारणामुळेच पाकमध्ये अराजक माजून त्याचे अनेक तुकडे झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारकडे देश चालवण्यापुरते पैसेही शिल्लक नाहीत, अशी जाहीररित्या स्वीकृती दिली. ‘पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रिव्हेन्यू’च्या पहिल्या ‘ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम’च्या उद्घाटनाच्या वेळी इम्रान खान म्हणाले, ‘‘देश चालवण्यासाठी पुरेसे पैसे नसणे, हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. विदेशांतून उधार घेणे भाग पडत असल्याने पाकिस्तानवर कर्जाचे ओझे वाढत चालले आहे.’’ पाकिस्तानवर १० वर्षांपूर्वी असलेले ६ ट्रिलियन (४४७ लाख कोटी भारतीय रुपयांहून अधिक) डॉलरचे कर्ज आज ३० (२ सहस्र २३५ लाख कोटी भारतीय रुपयांहून अधिक) ट्रिलियन डॉलरवर पोचल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. ‘ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम’द्वारे करचुकवेगिरी करणार्‍यांना शोधून काढून त्यांच्याकडून करवसुली केली जाणार आहे.

इम्रान पुढे म्हणाले की, सध्या पाकिस्तानची तिजोरी रिकामी आहे. उत्पन्न अल्प आहे आणि व्यय अधिक आहे. पाकिस्तानमध्ये करप्रणाली सुरळीतपणे लागू होऊ शकली नाही. लोकांनी करचुकवेगिरी केली. ही चांगली गोष्ट नाही; परंतु लोकांना ही गोष्ट अद्याप लक्षात आलेली नाही की, कर वसुली नागरिकांच्या हितासाठीच केली जाते. कर वसुलीत न्यूनता आणि वाढते विदेशी कर्ज यांमुळे पाकिस्तानवर देश चालवण्यासाठी पैसे नसण्याची  परिस्थिती ओढावली आहे. हा प्रश्‍न देशाच्या आर्थिक प्रश्‍नासह सुरक्षेच्या प्रश्‍नाशीही निगडित आहे.