आंबोली परिसरातील हॉटेलवर पोलिसांची धाड : हॉटेल मालकासह ३४ जणांवर कारवाई

अश्‍लील कारवायांमध्ये परप्रांतीय १८ युवक आणि १० युवतींचा समावेश

  • कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये पूर्ण क्षमतेने चालू केली नसतांना हॉटेल आदी चालू केल्याने झालेले दुष्परिणाम !
  • यांना साहाय्य करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा !
प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – तालुक्यातील आंबोली येथील जंगलात असलेल्या एका हॉटेलवर पोलिसांनी २२ नोव्हेंबरला रात्री धाड टाकून पर्यटक, वाढपी (वेटर) आणि हॉटेलचा मालक यांच्यासह ३४ जणांवर कारवाई केली. अनुमती नसतांना मद्य पिणे, अश्‍लील हावभाव करणे, धिंगाणा घालणे आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी या सर्वांवर गुन्हा नोंद करण्यात आल्याचे येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

आंबोली येथील एका हॉटेलवर अवैधरित्या मेजवानी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या हॉटेलवर धाड टाकली. या वेळी मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यांवर मद्यधुंद अवस्थेत अश्‍लील हावभाव करत नाचणारे आंध्रप्रदेश येथून आलेले १८ युवक आणि १० युवती यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

या सर्वांना पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने प्रत्येकी ७ सहस्र ५०० रुपयांच्या सशर्त जामिनावर सर्वांची मुक्तता केली.