प्रेमळ आणि अंतर्मुख असणार्‍या अन् संतसेवा भावपूर्ण करून संतांचे मन जिंकणार्‍या कु. साधना सावंत (वय २१ वर्षे) !

प्रेमळ आणि अंतर्मुख असणार्‍या अन् संतसेवा भावपूर्ण करून संतांचे मन जिंकणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. साधना सावंत (वय २१ वर्षे) !

‘कार्तिक कृष्ण पक्ष षष्ठी (२५.११.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या कु. साधना सावंत यांचा २१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. साधना सावंत

कु. साधना सावंत यांना २१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! 

१. जन्मापूर्वी

१ अ. गर्भारपणाच्या कालावधीत बाळाच्या ओढीने नामजप होणे : ‘मला गर्भधारणा झाल्यावर ‘बाळासाठी नामजप करायचा आहे’, या ओढीने माझा नामजप होऊ लागला. गर्भारपणाच्या ५ व्या मासात माहेरी असतांना मला आधुनिक वैद्य (डॉ.) मंगलकुमार कुलकर्णी यांचे साधनेविषयी मार्गदर्शन मिळाले.

१ आ. दुपारी घरातील व्यक्तींनी दिवा लावलेला नसतांना खोलीत दिवा लावल्याप्रमाणे पिवळा प्रकाश दिसणे : गर्भारपणातील आठवा मास चालू असतांना एकदा मला दुपारी फार उकडत होते; म्हणून मी लादीवर झोपले होते. काही वेळाने अकस्मात् मला जाग आली. तेव्हा मला आतल्या खोलीत दिवा लावल्याप्रमाणे पिवळा प्रकाश दिसला. मी त्या प्रकाशाकडे पाहिले आणि पुन्हा झोपले. मी उठल्यावर घरातील व्यक्तींना विचारले, ‘‘घरात कुणी आले होते का ? दिवा लावला होता का ?’’ तेव्हा मला समजले, ‘कुणीच दिवा लावला नव्हता.’

सौ. सुजाता सावंत

२. वय १ मास ते २ वर्षे

२ अ. बालिकेला सत्संगातून चैतन्य मिळणे : आमच्या घराजवळच्या श्री दुर्गादेवीच्या देवळात सनातनचा सत्संग चालू झाला होता. मी बालिकेला घेऊन सत्संगाला जायचे. तेव्हा बालिका मांडीवर शांत झोपून जणू ध्यान लागल्याप्रमाणे सत्संगातील चैतन्य ग्रहण करायची. तेथे मी तिला ३ मास साप्ताहिक सत्संगाला नेले. मी सासरी आल्यावर आमच्या घराजवळ कुठेच सत्संग नव्हता. ‘घरापासून अनुमाने ८ किलोमीटर अंतरावर हडपसर, पुणे येथे सत्संग आहे’, असे समजल्यावर मी तिला रिक्शाने सत्संगाला नेत होते.

२ आ. नामजप करणे : साधना दोन वर्षांची असतांना माझी बहीण तिला दुचाकीवरून तिच्या मैत्रिणीकडे घेऊन जायची. तेव्हा साधना मैत्रिणीच्या घरी पोचेपर्यंत मोठ्याने नामजप करत असे.

३. वय ३ ते १० वर्षे

३ अ. संतांचा सत्संग आणि सेवा मिळणे : आम्ही दुसरीकडे रहायला गेल्यावर मी नियमितपणे सत्संगाला जाऊ लागले. तिथे जवळच ननावरे कुटुंब रहात होते. आम्ही सेवेला गेल्यावर पू. ननावरेआजी (सनातनच्या ८० व्या संत पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी) साधनाला सांभाळायच्या आणि तिच्याकडून नामजप करवून घ्यायच्या. पू. आजींचे हात-पाय दुखायला लागल्यावर त्या तिला म्हणायच्या, ‘‘साधना, जरा पाय चेप ना ग !’’ साधनाने त्यांचे पाय चेपून दिल्यावर त्यांना लगेच बरे वाटायचे. पू. ननावरेआजी साधनाचे पुष्कळ लाड करायच्या आणि म्हणायच्या, ‘‘साधना गुणी आहे.’’

४. वय १० ते १९ वर्षे

४ अ. समाधानी वृत्ती : साधनाने लहानपणापासून कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट केला नाही. तिला जे देऊ, ते ती घ्यायची. तिला आवड-नावड नाही. ती समाधानी आहे.

४ आ. घरकामात साहाय्य करणे : साधना ८ व्या इयत्तेत असल्यापासून स्वयंपाक बनवायला शिकू लागली. मी स्वयंपाक करायला लागल्यावर ती मला म्हणायची, ‘‘आई, मी बनवते.’’ तेव्हा मी घरातील कामे करून सेवाही करत असे. त्या वेळी मला तिच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटायची.

४ इ. सेवेत साहाय्य करणे : साधनाच्या लहानपणापासून माझ्या मनात एकच विचार होता, ‘तिने साधना करावी.’ ती मला ग्रंथप्रदर्शनासाठी लागणारे ग्रंथ आणि उत्पादने यांचा साठा काढण्याच्या सेवेत साहाय्य करायची, तसेच ग्रंथप्रदर्शन झाल्यावर उत्पादनांचा शिल्लक साठा पडताळायलाही मला साहाय्य करायची.

४ ई. साधी रहाणी : माझ्या माहेरी माझ्या वहिनी साधनाचे पुष्कळ कौतुक करायच्या. साधनाचे रहाणीमान एकदम साधे आहे. ते त्यांना पुष्कळ आवडायचे. त्या साधनाला म्हणायच्या, ‘शहरात राहूनही एकदम साधी रहातेस.’

४ उ. नम्र आणि समंजस : माझ्या वहिनी म्हणायच्या, ‘‘साधनाला आई-बाबांशी कधी उलट किंवा मोठ्याने बोलतांना बघितले नाही. ते तिला जो पोशाख घेतील, तोच ती घालते. कसलाच हट्ट करत नाही.’’ तेव्हा मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटायची. मला वाटायचे, ‘आम्ही साधनेत नसतो, तर समाजातील लोकांसारखे वागलो असतो. मला मुलीला ‘योग्य आणि अयोग्य काय ?’, हे शिकवता आले नसते.’

४ ऊ. आश्रमजीवनाची आवड : साधनाची १० वीची परीक्षा झाल्यावर तिला सुटीत देवद आश्रमात पाठवले. त्यानंतर तिची १२ वीची परीक्षा झाल्यावर ती पुन्हा आश्रमात जाण्यास सिद्ध झाली. नंतर ती रामनाथी आश्रमात आली. तिला १५ दिवसांतच आश्रमजीवन पुष्कळ आवडू लागले आणि ती पूर्णवेळ साधना करू लागली.

४ ए. प्राण्यांवर प्रेम करणे : गोव्याला रहायला आल्यावर घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर रामनाथी आश्रम आहे. ती सकाळी रस्त्याने येता-जाता सर्व गायी-वासरांना हात लावून कुरवाळते. रात्री आम्ही दोघी परत घरी जातांना म्हणते, ‘‘या सर्वांना आपल्या घरी घेऊन जाऊया.’’ तिला प्राण्यांवर प्रेम करायला पुष्कळ आवडते.

५. वय २० वर्षे

५ अ. व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधिकेने साधनाचे कौतुक करणे : आश्रमात आम्हा दोघींना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली. त्या वेळी व्यष्टी साधनेचा आढावा देतांना साधनाच्या मनात कोणाविषयी सांगण्यासाठी काही नसायचे. ती कधीच बहिर्मुखतेने इतरांच्या चुकांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करत नसे. ‘प्रत्येक सेवा परिपूर्ण करणे’ हा तिचा गुण आहे. तेव्हा आढावासेविका म्हणाल्या, ‘‘साधनाच्या मनाची स्थिती कशी आहे बघा, हिच्या मनात कुणाविषयी काहीही नसते.’’

५ आ. सेवा शिकून दायित्व घेणे : साधनाची स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिला ग्रंथांची मुखपृष्ठे करण्यासंबंधित सेवा मिळाली. तिने हळूहळू सर्व शिकून घेतले. तिने आश्रमजीवन पूर्णपणे स्वीकारून सेवा दायित्व घेऊन करणे आरंभले.

५ इ. संतसेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करून संतांचे मन जिंकणे 

५ इ १. संतसेवा मनापासून करणे : मागील १ वर्षापासून साधना पू. संदीप आळशी यांना अल्पाहार, महाप्रसाद देण्याची सेवा करते. सगुण रूपातील ईश्वराची सेवा तिने अचूक आणि परिपूर्ण करून संतांचे मन जिंकले. तिला संतांच्या सेवेतील कुठलीही सूत्रे पुन्हा सांगावी लागत नाहीत. तिच्या मनात एकच विचार असतो, ‘सेवा चुकांविरहित आणि परिपूर्ण करावी.’ साधना मला सांगते, ‘‘आई, संतसेवा मिळणे किती भाग्याचे आहे !’’

५ इ २. सेवेविषयी कर्तेपणा नसणे : एकदा पू. संदीपदादांनी साधनाने केलेले बटाटेपोहे खाल्ले. तेव्हा पू. दादा तिला म्हणाले, ‘‘पोहे छान झाले आहेत.’’ त्या वेळी तिच्या तोंडवळ्यावर कर्तेपणा दिसत नव्हता. तिने केलेल्या सेवेविषयी तिला अहं किंवा कर्तेपणाचा विचार नसतो.

५ इ ३. नेहमी आनंदी असणे : ती पू. संदीपदादांची, तसेच अन्य संतांची सेवा अंतर्मुख होऊन आणि मन लावून करते. एकदा पू. संदीपदादा म्हणाले, ‘‘साधनाकडे पाहिल्यावर आनंद जाणवतो. तिचे नाव ‘आनंदी’ ठेवायला हवे.’’

६. ‘कोणत्याही प्रसंगात न अडकता अंतर्मुख कसे व्हायचे ?’, हे मुलीकडून शिकायला मिळणे

आश्रमात येऊन पूर्णवेळ साधना करू लागल्यावर साधनाला गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) अधिक ओढ वाटू लागली. ती देवाला सर्वकाही सांगत असते. मी मायेतील एखाद्या प्रसंगाविषयी विचार व्यक्त केल्यावर ती मला लगेच म्हणते, ‘‘आई, तू अजून तोच विचार करतेस का ? सोडून दे. नामजप कर.’’ कोणताही प्रसंग घडल्यास साधना मनाला लावून घेत नाही. ती त्याविषयी विचार न करता सेवेत एकाग्रता साधते. ‘प्रसंगात न अडकता अंतर्मुख कसे व्हायचे ?’, ते मला तिच्याकडून शिकायला मिळाले.

‘देवा, मला माझ्या मुलीतील सर्व गुण शिकता येऊ देत. तुम्हाला अपेक्षित अशी साधनाची उत्तरोत्तर प्रगती करवून घ्या’, अशी मी प्रार्थना करते.’

– सौ. सुजाता सावंत (कु. साधनाची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२१)

• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद्गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक