‘वर्ष २०१३-१४ मध्ये काही दिवस मला मुंबई येथे समष्टी सेवा करण्याची संधी मिळाली. या कालावधीत श्री गुरूंच्या कृपेने मला सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचे साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनातून लक्षात आलेली सूत्रे आणि स्वतःची अयोग्य विचारप्रक्रिया येथे दिली आहे.
१. स्वतःच्या मनाने केलेले नियोजन सद्गुरु अनुताईंना दाखवल्यावर त्यांनी नियोजनात न अडकता शिकण्यास प्राधान्य देण्यास सांगणे
प्रारंभी मुंबईतील एक-दोन सेवांचे दायित्व माझ्याकडे आले. त्यानंतर मी मनानेच दिवसभराचे माझे वेळापत्रक सिद्ध केले आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना ‘असे नियोजन केले, तर चालेल का ?’, हे विचारण्यासाठी गेलो. त्या वेळी तिकडे धर्मसभेची सिद्धता चालू होती. सद्गुरु ताईंनी मला सांगितले, ‘‘तुला शिकायचे आहे ना ? मग तू नियोजनात अडकू नकोस, तर शिकण्याला प्राधान्य दे.’’ तेव्हा प्रथमच सद्गुरु ताईंनी मला विचारांच्या चौकटीच्या बाहेर काढले.
२. नियोजनाच्या संदर्भात असलेली स्वतःची अयोग्य विचारप्रकिया !
पूर्वीपासून ‘ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कृती करायची’, अशी माझी सवय होती. तेथे सेवाकेंद्रात दिवसभराचे एक निश्चित वेळापत्रक असायचे. या वेळापत्रकात मन परिस्थितीनुसार पालट करण्यास सिद्ध नसायचे; पण आवडीनुसार मात्र कधीही प्राधान्य पालटले जायचे. पुढे प्रसारात सेवा करतांना नियोजनाच्या संदर्भात मला काही अयोग्य कृती आणि माझे विचार लक्षात आले.
अ. तातडीच्या सेवा करतांना मला वेळ आणि परिस्थिती यांचे भान रहात नाही.
आ. ‘काही चूक रहायला नको’, या विचारात एखाद्या सेवेला अधिक वेळ दिला जातो.
इ. सेवेचा प्राधान्यक्रम विचारला जात नाही, तसेच सेवेत कुणाचे साहाय्यही घेतले जात नाही.
या अयोग्य विचारप्रकियेतून ‘स्वतःच्या अडचणी सातत्याने सांगून प्राधान्यक्रम ठरवणे आणि सेवा करण्याची पद्धत विचारून घेणे’, हे सद्गुरु अनुताई यांनी माझ्या लक्षात आणून दिले.
३. ‘सेवेची गती आणि गुणवत्ता यांची योग्य सांगड हवी’, हे सद्गुरु अनुताईंच्या मार्गदर्शनातून शिकायला मिळणे
माझी सेवेची गती पुष्कळ अल्प झाली होती. अनेक दिवस मी एक कृती माझ्या नियोजनात लिहायचो; पण त्याला प्राधान्य देत नव्हतो. त्या वेळी ‘प्रत्येक कृतीमागील दृष्टीकोन आणि विचारप्रक्रिया योग्य हवी, तर सेवेचा वेग वाढतो, तसेच प्रत्येक सेवा करतांना कृतीपेक्षा गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यायला हवे’, हे सद्गुरु अनुताईंच्या मार्गदर्शनातून मला शिकायला मिळाले.
४. सद्गुरु अनुताईंनी बहिर्मुखतेची जाणीव करून देऊन ‘सेवा स्वीकारल्याने शिकण्यातील आनंद घेता येईल’, हे लक्षात आणून देणे
अनेकदा माझ्याकडून सांगितलेली सेवा मनापासून स्वीकारली जायची नाही किंवा स्वतःच्या ठरवलेल्या नियोजनात पालट करण्याची माझी इच्छा नसायची. माझ्यात बहिर्मुखताही इतकी होती की, ‘त्या वेळी मी सेवा स्वीकारली आहे’, असेच मला वाटायचे; पण प्रत्यक्षात कृती करतांना मी पूर्वी स्वतः केलेल्या नियोजनानुसारच ती करत असे. याविषयी सद्गुरु अनुताई यांनी मला जाणीव करून दिली. त्यांनी ‘सेवा न स्वीकारण्यामध्येच मनाची शक्ती व्यय होते. याउलट ती सेवा स्वीकारली, तर आपल्याला शिकण्यातील आनंद घेता येईल’, हे लक्षात आणून दिले.
५. ‘इतरांनी नेमक्या शब्दांत सांगितले पाहिजे’, या अपेक्षेच्या विचारावर सद्गुरु अनुताईंनी दिलेला दृष्टीकोन !
‘मी नेमक्या शब्दांत बोलतो, तसे इतरांनीही नेमक्या शब्दांत सांगितले पाहिजे’, अशी माझ्या मनाची धारणा होती. त्यामुळे कुणी विस्ताराने बोलत असेल, तर मला ‘माझा वेळ वाया जात आहे’, असे वाटायचे. ‘इतरांचे अनुभव ऐकून घेणे’, ही साधना आहे. प्रत्येकातून देव बोलतो, तर आपण इतरांना न्यून का लेखायचे ? मन शुद्ध करण्यासाठी आपल्याला ते स्वीकारायचे आहे. काहीतरी निष्कर्ष काढण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनापासून ऐकले पाहिजे. त्या बोलण्यात परात्पर गुरु डॉक्टरांना शोधायचे’, असा दृष्टीकोन सद्गुरु ताईंनी दिल्यावर ‘बुद्धीच्या स्तरावर तरी इतरांचे ऐकायला हवे’, हे मला कळायला लागले.
६. ‘सहसाधकांविषयी कसे विचार असायला हवेत ?’, हे सद्गुरु अनुताईंकडून शिकायला मिळणे
एकदा सहसाधकांविषयी सांगतांना सद्गुरु अनुताई म्हणाल्या, ‘‘स्वतःची सहसाधकाशी जवळीक आणि समन्वय आहे का ? त्याच्याविषयी प्रेम वाटते का ? एकमेकांसाठी त्याग करण्याची सिद्धता असते का ? ‘मी माझ्या स्तरावर सुधारणा करतो’, हा अहंयुक्त विचार सोडून कमीपणा घेऊन प्रयत्न केले जातात का ?’, हे सतत अभ्यासायला हवे.’’
यातून ‘सहसाधकांविषयी कसे विचार असायला हवेत ?’, हे मला शिकायला मिळाले.’
– श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), उज्जैन, मध्यप्रदेश. (१०.८.२०१८)