आस्तिक असणे, हा ‘पंडित’ होण्याचा मुख्य गुण आहे !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘आजचे अनेक नास्तिक बुद्धीजिवी व्यावहारिक ज्ञान देणारे मोठमोठे निधर्मी ग्रंथ वाचून, देश-विदेशात उच्च शिक्षण घेऊन आणि वेगवेगळ्या पदव्यांनी विभूषित होऊन स्वत:ला ‘पंडित’ समजतात. आपल्या वैदिक संस्कृतीत नास्तिकांना ‘पंडित’ म्हटलेले नाही. नास्तिक तर कृतघ्न असतात. ज्या ईश्वराने या सृष्टीची रचना केली आणि मनुष्याला जीवन दिले, त्याला चरितार्थ चालवण्यासाठी केवळ साधनेच दिली नाहीत, तर जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका होण्यासाठी वेगवेगळे योगमार्गही सांगितले आहेत, अशा ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे ‘पंडित’ कसे असू शकतात? आजचे तथाकथित बुद्धीवादी हे ईश्वराचे अस्तित्व नाकारून स्वतःला ‘पंडित’ म्हणून समाजाची दिशाभूल करण्यात मग्न असतात. अशा सर्वांनी परम आदरणीय महात्मा विदुरांच्या पुढील अमृत वचनाचे अवश्य पठण करायला हवे. त्यात त्यांनी पंडिताची वैशिष्ट्ये सुस्पष्ट करून सांगितली आहेत  –

निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते ।
अनास्तिकः श्रद्दधान एतत्पण्डितलक्षणम् ।।

– विदुरनीति, अध्याय १, श्लोक १७

अर्थ : उत्तम कर्माचे आचरण करणे, निंदनीय कर्मापासून परावृत्त असणे, आस्तिक आणि श्रद्धावान असणे, ही विद्वानाची लक्षणे आहेत.

हिंदु राष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात वैदिक धर्मशास्त्राचा समावेश केला जाईल. त्यामुळे हिंदु राष्ट्रात आजसारखे नास्तिक बुद्धीजिवी नसतील.’

– पू. तनुजा ठाकूर (१९.११.२०२१)