सरकारी दिशाहीनता !

संपादकीय 

मंदिर सरकारणीमागे दिशाहीन शासनतंत्र असल्याने त्यास प्राणपणाने विरोध करा ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

आज खासगीकरणाच्या युगामध्ये मंदिरांचे सरकारीकरण केले जाणे, हे संतापजनक नव्हे काय ? गेल्या काही दशकांमध्ये देशातील अनुमाने ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले. सरकारीकरणाचा विषय हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असला, तरी केंद्रातील भाजप शासनाने मंदिरांचे सरकारीकरण रहित करावे, अशी मागणी संत समाजाने नुकतीच  केली आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारलेल्या भारताने धर्माचा आधार घेऊन निर्णय घेणे, धर्माधारित भेदभाव करणे घटनात्मकदृष्ट्या अयोग्य आहे. असे असले, तरी केवळ बहुसंख्यांक हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा घाट घातला गेला. मशिदी, चर्च आदींना हात न लावता उलट त्यांच्या विकासासाठी पैसा ओतला गेला. अल्पसंख्यांकांच्या कल्याणाप्रीत्यर्थ वर्ष २००६ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने अल्पसंख्यांक मंत्रालयाची स्थापना केली आणि अल्पसंख्यांक अन् विशेषत: मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची अधिकृत मोहीम राबवायला आरंभ केला. आतापर्यंत अल्पसंख्यांकांवर शेकडो कोटी रुपयांची खैरात करण्याचा पायंडा पाडला आहे. आतापर्यंतच्या सरकारांनी मतांच्या हव्यासापोटी अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्यातच धन्यता मानली; मग त्यापुढे बहुसंख्य हिंदु किंवा राष्ट्र यांचाही विचार केला नाही. त्यामुळे अल्पसंख्यांकांचा सरकारी स्तरावरून अनुनय होणे, हे जेवढे घटनाद्रोही आहे, तेवढेच किंबहुना त्याहून कैकपटींनी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण घटनाबाह्य आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

मुळात ‘मंदिरांचे व्यवस्थापन चांगले व्हावे’, यासाठी त्यांचे सरकारीकरण करण्यात आल्याचे सांगितले जाते; परंतु दशकानुदशके अनेक मंदिरे सरकारी बाबू आणि त्या माध्यमांतून राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनून राहिली. तमिळनाडू राज्याचे उदाहरण या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या ११ सहस्र ९९९ मंदिरांमध्ये पूजा होत नाही. तसेच ३७ सहस्र मंदिरांची देखभाल-दुरुस्ती, पूजा आणि व्यवस्थापन यांसाठी केवळ एकाच व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील ५१ मंदिरांचे सरकारीकरण नुकतेच करण्यात आले. याखेरीज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांतील सहस्रावधी मंदिरे याआधीच सरकारने कह्यात घेतली आहेत. मंदिरांचे सरकारीकरण झाले, तरी त्याचा लाभ न होता देवनिधीचा अपव्यवहार यांसारखे तोटेच अधिक होत राहिले. यामुळेच संतांनी यास विरोध केला आहे.

महान हिंदु प्रतिरोध !

या संदर्भात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री राजेंद्र दास यांच्या वक्तव्याचा उल्लेख व्हायला हवा. ते म्हणाले, ‘‘जर देवनिधी राजकोषामध्ये गेला, तर राजकोष कधीही भरणार नाही, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.’’ या वक्तव्याच्या माध्यमातून ‘धर्महीन’ भारत कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे ? हे लक्षात येऊ शकेल. इतिहासात डोकावून पाहिल्यास याची उत्तरे आपल्याला सापडतात. ६ व्या शतकामध्ये केवळ १५ वर्षांच्या कालावधीत अरबांनी पर्शियातील म्हणजे आजच्या इराणमधील पारशी पंथाचा नायनाट केला. महंमद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर केवळ १०० वर्षांतच अरबांनी दक्षिण युरोपातील भूभागासह संपूर्ण मध्य आशिया त्यांच्या अंमलाखाली आणला. असे असले, तरी केवळ सिंधवर विजय मिळवण्यासाठी ७५ वर्षे, तर पंजाब प्रांतावर प्रभुत्व मिळवण्यासाठी म्लेंच्छांना ४ शतके लढावे लागले. १३०० वर्षांच्या प्रदीर्घ आक्रमणांनंतरही भारत पुरून उरला. यामागील कारण हे केवळ भारताचे शूरवीर राजे आणि प्रजा अस्तित्वात होती, एवढ्यावरच सीमित असल्याचे म्हणता येणार नाही. युरोपातील पगान पंथ, बेबीलॉन, पर्शिया, इजिप्त येथेही महान योद्धे होऊन गेले, ज्यांनी त्यांची संस्कृती आणि राष्ट्र यांचे रक्षण करण्यासाठी सर्वस्वाचे बलीदान केले; परंतु तरीही आज जगाच्या नकाशावर त्यांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणाही अस्पष्ट झाल्या आहेत. याउलट हिंदु धर्माने सर्व आघात झेलले नव्हे, तर पचवले. आत्मरक्षणासाठी केलेल्या जगातील सर्वांत प्रचंड प्रतिरोधासाठी लागलेले आवश्यक आत्मबळ हे साधना आणि भक्ती यांतूनच हिंदूंमध्ये झिरपले. राजपूत, शीख आणि मराठा राजे यांच्या आधीही रामायण, महाभारत यांसारखे शेकडो धर्मग्रंथ हिंदूंना शस्त्रासमवेतच शास्त्राचा म्हणजेच आध्यात्मिक साधनेचा पुरस्कार करण्यासाठी प्रेरक राहिले. ही महान शिकवण आचरणात आणल्यानेच हिंदु स्वधर्माचे अस्तित्व टिकवू शकले.

धर्माधारित भारत !

आधुनिक भारताने मात्र याच धर्माला तिलांजली दिली. धर्म आणि अध्यात्म यांचे बळ, तसेच त्यांच्या प्रायोगिक लाभांपासून शासनकर्ते अन् जनता अनभिज्ञ आहे. धर्माचा सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनावर किती मोठा प्रभाव पडतो ? हे आमच्या अनेक कर्मदरिद्री हिंदूंना ज्ञातच नाही. धर्मामुळे हिंदूंचा वैभवसंपन्न भारत टिकून राहिला, तो भारत आज हतबल झाला आहे. केवळ ७५ वर्षांच्या निधर्मीपणामुळेच हिंदु धर्म मरणप्राय स्थितीला पोचेल कि काय ? अशी भीती व्यक्त केली जात आहे. २०० वर्षांपूर्वीपर्यंत ‘गुरुकुलपद्धती’ ही हिंदु धर्मरक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आली; परंतु १९ व्या शतकात ब्रिटिशांच्या हिंदुद्रोही भूमिकेमुळे ही यंत्रणा मोडीत काढली गेली. त्यामुळे आज केवळ मंदिरे हीच हिंदु धर्माची आधारशीला राहिली आहेत. त्यामुळे मंदिरांतील प्रथा-परंपरांना होणारा विरोध, मंदिरांचे सरकारीकरण, आक्रमणे यांसारखे कोणत्याही प्रकारचे आघात झाले, तरी हिंदूंनी त्यास प्राणपणाने विरोध केला पाहिजे. आजचे शासनतंत्र मंदिरांचा पैसा सामाजिक कारणांसाठी वापरत आहे. शास्त्रापासून पूर्ण विलग झालेल्या सरकारचे दिशाहीन तंत्रच याला उत्तरदायी आहे. याचा प्रत्येक सूज्ञ भारतियाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा आणि संत समाजाच्या पाठीशी उभे रहायला हवे. मंदिरांचे सरकारीकरण रहित होईपर्यंत हिंदूंनी एकमुखाने आवाज उठवायला हवा. धर्माधारित भारत म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापल्यासच मंदिरांचे आणि पर्यायाने हिंदु धर्माचे आगामी काळात रक्षण होऊ शकेल, हे लक्षात घ्या !