कर्तव्यतत्परता आणि सेवाभावी वृत्ती असलेले लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील श्री. जयेश जनार्दन शेट्ये !

श्री. जयेश शेट्ये

१. समाधानी वृत्ती

‘माझे यजमान श्री. जयेश जनार्दन शेट्ये यांना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही. ते नेहमी समाधानी असतात.

२. मिळून-मिसळून रहाणे

त्यांना सर्वांशी मिळून-मिसळून रहायला आवडते. सर्व नातेवाईक, गावातील लोक, महाविद्यालयातील कर्मचारी अन् सर्व साधक, या सर्वांशी त्यांचे पुष्कळ चांगले संबंध आहेत.

३. प्रामाणिकपणा

ते उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नोकरी करतात. तेथे वेळेत उपस्थित रहाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तिथल्या सेवा ते प्रामाणिकपणे करतात. त्यांना ‘उत्कृष्ट कर्मचारी’ पुरस्कारही मिळाला आहे. समाजातील उपक्रमांमध्येही ते आवडीने सहभाग घेतात. ‘सामाजिक कार्यासाठी वर्गणी गोळा करणे, रक्तदानाच्या शिबिरामध्ये रक्तदान करणे’ इत्यादी सेवा ते करतात.

४. इतरांचा विचार करणे

ते स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार अधिक करतात. ते नेहमी समोरच्या व्यक्तीला प्राधान्य देतात.

५. सकारात्मक

सौ. शालन शेट्ये

ते स्वतः नेहमी सकारात्मक रहातात आणि इतरांनाही सकारात्मक दृष्टीकोन देतात.

६. कर्तव्यपालन

ते त्यांची कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्ये परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते ‘घराची स्वच्छता करणे, कपडे धुणे, आईकडे लक्ष देणे, आईला साहाय्य करणे’ इत्यादी सर्व साधना म्हणून करतात. याआधी त्यांना हे सर्व करण्याची सवय नव्हती.

७. तत्त्वनिष्ठ

ते समोरच्याला जे योग्य असेल, ते मनामध्ये कोणताही आकस किंवा वाईट हेतू न ठेवता तत्त्वनिष्ठतेने सांगतात.

८. धर्माचरणाची आवड

ते प्रतिदिन कपाळाला टिळा लावतात. मुलींनी कपाळाला कुंकू लावले नसल्यास ते त्यांना लगेच जाणीव करून देतात.

९. सेवाभाव

अ. श्री. जयेश ‘आपल्याला मिळालेल्या वेळेचा सेवेसाठी कसा विनियोग करायचा ?’, याचे नियोजन करून ठेवतात. ते सुटीच्या दिवशी दिवसभराच्या सेवांचे नियोजन करतात. तेव्हा ते फारशी विश्रांतीही घेत नाहीत. नोकरी सांभाळून अधिकाधिक सेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. संतांनी सांगितल्याप्रमाणे साधना आणि सेवा करण्याकडे त्यांचे लक्ष असते.

आ. वर्षभरातील राहिलेल्या सुट्या ते सेवेसाठी राखून ठेवतात आणि झोकून देऊन सेवा करतात.

इ. ते कितीही सेवा केल्या, तरी कधी थकलेले दिसत नाहीत. किंबहुना सेवा करून आल्यावर ते अधिक उत्साही आणि आनंदी दिसतात.

१०. अहं अल्प असणे

श्री. जयेश नेहमी सगळा कर्तेपणा श्री गुरुचरणी अर्पण करतात. ‘मला काही कळत नाही. सर्व देवच करवून घेत असतो’, असा त्यांचा भाव असतो. ते मलाही ‘तुझ्यामुळे हे चांगले झाले,’ असे म्हणून श्रेय देतात.

११. परिस्थिती स्वीकारणे

कोणतीही गोष्ट मनासारखी नाही झाली, तरी ते लगेच स्वीकारतात. अशा वेळी ‘देवाचे काहीतरी नियोजन असेल’, असा त्यांचा विचार असतो.

१२. अनुभूती

अपघात झाल्यावर ‘बरे होण्यासाठी ८ – १० दिवसांचा कालावधी लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे आणि सनातनचे साधक रुग्णालयात येऊन भेटून गेल्यावर आधुनिक वैद्यांनी घरी जाण्याची अनुमती देणे : वर्ष २००७ मध्ये त्यांना अपघात होऊन त्यांच्या मेंदूला मार लागला होता. तेव्हा ते कोल्हापूर येथे उपचार घेत होते. ‘ठीक होण्यासाठी त्यांना ८ – १० दिवसांचा कालावधी लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. दुसर्‍या दिवशी साधिका सौ. पल्लवी लांजेकर अन्य साधकांच्या समवेत त्यांना भेटून गेल्या. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘त्यांना घरी पाठवू शकतो.’’ तेव्हा श्री. जयेश यांच्या काकांनाही आश्चर्य वाटले. ‘सनातनचे साधक भेटून गेले आणि यांना बरे वाटले’, असे त्यांना वाटले.

‘गुरुदेवा, मला माझ्या यजमानांकडून साधनेच्या संदर्भातील अनेक गोष्टी शिकता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. शालन जयेश शेट्ये, लांजा, जिल्हा रत्नागिरी (१६.१२.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक