न्यायाधिशांना मारहाण करणारे पोलीस जनतेशी कसे वागत असतील, हे लक्षात येते !

अतिरिक्त न्यायाधीश अविनाश कुमार आणि त्यांच्यावर हल्ला करणारे पोलीस

मधुबनी (बिहार) – येथील झांझारपूर येथे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अविनाश कुमार यांच्यावर आक्रमण केल्याच्या आणि त्यांना अश्‍लील शब्दांत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी दोघा पोलिसांना अटक करण्यात आली. या पोलिसांनी न्यायाधीश अविनाश कुमार यांना मारहाण करत त्यांच्यावर पिस्तुल रोखले.

एका प्रकरणात न्यायाधीश अविनाश कुमार यांनी ‘मधुबनी येथील पोलीस अधीक्षक डॉ. सत्यप्रकाश यांना कायदा शिकवावा’, असे पत्र केंद्र सरकारला लिहिले होते. त्यावरून दोन पोलिसांनी न्यायाधिशांना ‘तुझी लायकी काय आहे ते आज दाखवतो. तू आमच्या बॉसला त्रास दिला आहे. तुला तुझी लायकी दाखवतो’, अशी धमकी दिली. या वेळी न्यायाधिशांच्या सुरक्षारक्षकांनी तात्काळ पोलिसांना पकडले. या गोंधळात न्यायाधिशांना किरकोळ दुखापत झाली. न्यायालयात उपस्थित असणार्‍या काही अधिवक्त्यांनी आरोपी पोलिसांना चोपले.