मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘फार्म हाऊस’वरील २ कोटी ३५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर, १९ नोव्हेंबर – मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चंदगड तालुक्यातील ढोलकरवाडी येथील अधिवक्ता राजकुमार राजहंस यांच्या फार्म हाऊसवर धाड टाकून २ कोटी ३५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. कुक्कुटपालन आणि शेळीपालनाच्या नावाखाली येथे अमली पदार्थ सिद्ध केले जात होते. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने अधिवक्ता राजकुमार राजहंस यांना मालाड येथून अटक केली आहे.

१३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई पोलिसांच्या वांद्रे येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने साकीनाका येथून क्रिस्टियाना तथा आयेशा हिला कह्यात घेतले होते. तिचे अन्वेषण केले असता तिच्याजवळ ५ लाख रुपयांचे ‘एम्.डी.’ नावाचे अमली पदार्थ सापडले होते. आयेशाने हे अमली पदार्थ एका व्यक्तीने दिले असून ते कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड येथील कारखान्यात बनवले जातात, असेही पथकाला सांगितले. यानंतर पथकाने चंदगड पोलिसांच्या सहकार्याने ढोलकरवाडी येथील फार्महाऊसवर धाड टाकली असता तेथे अमली पदार्थ करण्याचा कारखानाच आढळून आला. ही कारवाई मुंबईचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.