सांगली जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोविड योद्ध्यांचा ठाणे येथे सत्कार !

सांगली जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक विनायक गोंदिल (डावीकडे) यांचा सत्कार करतांना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (उजवीकडे)

सांगली (जिल्हा सांगली), १९ नोव्हेंबर – बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचा ४ था वर्धापनदिन नुकताच ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात काम केलेल्या व्यक्ती, संस्था आणि रुग्णालये यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सांगली जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातील कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यात सांगली जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक विनायक गोंदिल, पलूस तालुका समन्वयक अजित राजमाने, खानापूर तालुका समन्वयक डॉ. धनंजय मैदानकर, कवठेमहांकाळ तालुका समन्वयक सिद्धेश्‍वर भोसले, वाळवा तालुका समन्वयक दिलीप शेखर, शिराळा तालुका समन्वयक विनोद आढाव, जत तालुका समन्वयक श्रीशैल पाटील यांचा कोविड योद्धा म्हणून कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या वतीने ४ वर्षांपूर्वी चालू केलेल्या या कक्षाचे आता २२ जिल्ह्यांमध्ये सेवाकार्य चालू आहे. रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून हा आरोग्ययज्ञ यापुढील काळातही अखंडपणे चालू रहावा.’’