रावणाचे विमान आणि विमानतळ यांच्यावर श्रीलंका करणार संशोधन !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – ‘जगातील पहिले विमान रावणानेच चालवले’, अशी अनेक श्रीलंकावासियांची श्रद्धा आहे. रावणाकडे स्वत:चे विमान आणि विमानतळही होते, असे सांगण्यात येत असले, तरी त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असा दावा केला जातो. त्यामुळेच आता श्रीलंकेतल्या काही संशोधकांकडून रावणाच्या विमानाविषयी शोध घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

१. दोन वर्षांपूर्वी कोलंबोत नागरी हवाई तज्ञ, इतिहासकार, पुरातत्व शास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक यांची एक परिषद झाली. ‘श्रीलंकेतून भारतात जाण्यासाठी आणि भारतातून परत श्रीलंकेत येण्यासाठी रावणाने त्याच्या विमानानेच प्रवास केला होता’, असा निष्कर्ष या परिषदेत काढण्यात आला होता. या परिषदेनंतर संशोधन करण्यासाठी श्रीलंकेच्या सरकारने ५० लाख रुपयांचा निधी संमत केला. कोरोना काळातील दळणवळण बंदीमुळे हे संशोधन काही काळ थांबले होते. ‘पुढच्या वर्षीच्या आरंभी संशोधक हे काम चालू करतील, अशी अपेक्षा आहे,’ असे श्रीलंकेच्या नागरी हवाई वाहतूक प्रधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दाणातुंगे यांनी सांगितले.

२. शशी दाणातुंगे पुढे म्हणाले की, रावण केवळ पुराणातील एक पात्र नाही, तर तो खराखुरा राजा होता. त्याच्याकडे स्वत:चे विमान आणि विमानतळही होते, याची आम्हाला निश्चिती आहे. त्यावर वस्तूनिष्ठ संशोधन होणे आवश्यक आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या प्राचीन काळातील या प्रगतीविषयी सर्वांना माहिती व्हावी, यासाठी भारतानेही श्रीलंकेला साथ द्यावी, अशी विनंती शशी दाणातुंगे यांनी भारत सरकारला केली आहे.