व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणारी आणि मित्र-मैत्रिणींना नामजप करण्यास उद्युक्त करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. आराध्या चव्हाण !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आराध्या चव्हाण ही या पिढीतील एक आहे !

व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणारी आणि मित्र-मैत्रिणींना नामजप करण्यास उद्युक्त करणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. आराध्या चव्हाण (वय ९ वर्षे) !

 ‘वर्ष २०१६ मध्ये कु. आराध्या विनोद चव्हाण हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के घोषित करण्यात आली होती. आता वर्ष २०२१ मध्ये तिची पातळी ५७ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सातारा येथील कु. आराध्या विनोद चव्हाण हिची आई, आजी आणि मावशी यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. आराध्या चव्हाण

सौ. स्वप्ना विनोद चव्हाण (कु. आराध्याची आई), सातारा

सौ. स्वप्ना विनोद चव्हाण

१. सात्त्विकतेची आवड

‘आराध्याला पूजा आणि देवासमोर सात्त्विक फुलांची रचना करायला अन् रांगोळी काढायला आवडते. तिने केलेली देवपूजा पाहून सात्त्विकता जाणवते आणि आनंद होतो.

तिला कृष्णाची भक्तीगीते ऐकायला आवडतात. ती श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र रेखाटते. ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ वारंवार पहाते. आपण जसा सण साजरा करतो, त्याप्रमाणे ती खेळतांना सण साजरा करते. तेव्हा ती देवतांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवते.

२. निरीक्षणक्षमता

आम्ही रहात असलेल्या इमारतीतील एका दुकानाबाहेर एकदा सनातन संस्थेचे धर्मशिक्षणविषयक लिखाण लिहिलेला फलक उलटा झाला होता. आराध्या दुकानात गेल्यावर तिच्या ते लक्षात आले. तिने लगेच घरी येऊन मला फलक नीट करून ठेवायला सांगितला.

३. व्यष्टी साधनेची आवड

आराध्या नामजप करते. ती दिवसभरात अधून-मधून स्वतःवरील आवरण काढते. ती तिच्याकडून झालेल्या चुका सांगते. मागील दोन मासांपासून तिने तिच्या प्रयत्नांचा आढावा लिहिण्यासाठी एक वही बनवली आहे. तिने वहीत ‘आवरण काढणे, मंत्रजप करणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे, नामजप करणे’, असे रकाने करून त्यात ती स्वतःकडून दिवसभरात किती प्रयत्न झाले ?’, याचा संख्यात्मक आढावा लिहिते. तिला असे करायला कुणीही सांगितले नव्हते, तरीही तिने व्यष्टी साधनेचा आढावा लिहिणे चालू केले.

४. इतरांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे

आराध्या तिच्या समवेत खेळणार्‍या मुलांनाही नामजप करायला सांगते. तिने सांगितल्यानुसार मुलेही नामजप करतात. आमच्या शेजारी रहाणार्‍या आराध्याच्या एका मैत्रिणीच्या स्वभावात नामजपामुळे पालट झाल्याचे तिच्या आईने सांगितले. आराध्याची एक मैत्रीण व्यष्टी साधनेतील सर्व सूत्रे पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, उदा. नामजप करणे, आवरण काढणे. तिने आराध्याकडून सनातनची उदबत्ती आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ही घेतला आहे.

५. समंजस

आराध्या लहानपणापासूनच समंजस आहे. २४.४.२०२१ या दिवशी माझा ‘कोरोना’ चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. तेव्हा माझ्या दोन्ही मुली २१ दिवस माझ्यापासून प्रथमच वेगळ्या राहिल्या. मी दोघींपासून दूर असतांना आराध्या मला ‘आम्ही दोघी ठीक आहोत. आही नामजपादी उपाय करत आहोत. तू तुझी काळजी घे. तू नामजपादी उपाय कर. परात्पर गुरुदेवांचा ग्रंथ समवेत ठेव’, असे सांगत असे. त्या कालावधीत तिने तिच्या लहान बहिणीचीही (चि. कार्तिकी (वय ५ वर्षे) काळजी घेतली.

६. आश्रमजीवन अनुभवण्याची इच्छा असणे

आराध्या तिच्या आजीकडे (सौ. सुलभा लोंढे यांच्याकडे (आराध्याच्या आईची आई) रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारी तिची मावशी कु. श्रद्धा लोंढे हिच्या आधीच्या जीवनाविषयी विचारपूस करायची. तेव्हा आजी तिला मावशीची वैशिष्ट्ये सांगायची. ती २१ दिवस आजीकडे असतांना तिने मावशीविषयी सर्व ऐकून रामनाथी आश्रमात जाऊन परात्पर गुरुदेवांना भेटण्याचा हट्ट केला. ‘आश्रमात येण्याविषयी विचारणा करणारे पत्र कसे लिहायचे ?’, हेही तिने मावशीला भ्रमणभाष करून विचारून घेतले.

७. इतरांचा विचार करणे

कोरोनाच्या आजारातून बाहेर पडल्यानंतर माझी शारीरिक स्थिती ठीक नव्हती. एकदा मला थकवा असल्याने मी झोपले असतांना आराध्याने वडिलांना घरकामात साहाय्य केले. ती तिच्या बाबांना म्हणाली, ‘‘आम्ही दोघी आजीकडे जातो. आईला बरे वाटत नाही ना !’’ तेव्हा मला अश्रू अनावर झाले.

८. अनुसंधानात असणे

‘ती परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात आहे’, असे जाणवते. ‘प्रत्येक कठीण प्रसंगात ‘परात्पर गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, याची ती आम्हाला जाणीव करून देते.

९. आराध्याचे स्वभावदोष

‘वेंधळेपणा, चिडचिडेपणा आणि मनानुसार वागणे’

सौ. सुलभा लोंढे (कु. आराध्याची आजी, आईची आई) सातारा

सौ. सुलभा लोंढे

१. शिकण्याची वृत्ती

‘आराध्या माझ्याकडे असतांना ‘पोळी, भाजी आणि भाकरी करणे’ आदी गोष्टी माझ्याकडून शिकत होती. ती प्रत्येक कृती आनंदाने करायची. तिची शिकण्याची वृत्ती पाहून मला कौतुक वाटायचे.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा

एकदा तिची आई रुग्णालयात गेली असतांना ती ३ घंट्यांनी आमच्या घरी आली. आई रुग्णालयात गेल्यावर घरात आराध्या आणि तिची लहान बहीण दोघीच त्यांच्या घरी होत्या. त्या वेळी तिने ‘स्वतःची आणि बहिणीची काळजी घेतली’, हे ऐकून माझी भावजागृती झाली. मी तिला विचारले, ‘‘तुला भीती वाटली नाही का ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘गुरुदेव सर्वकाही सांभाळतात’’; म्हणून मला कृतज्ञता वाटली.’

कु. श्रद्धा लोंढे (आराध्याची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. श्रद्धा लोंढे
कु. श्रद्धा लोंढे

१. प्रेमभाव

‘आराध्या भ्रमणभाषवर संपर्क केल्यावर निरागसतेने बोलते. तिच्या बोलण्यात गोडवा असल्याने ‘तिच्याशी बोलत रहावे’, असे मला वाटते.

२. स्वीकारण्याची वृत्ती

आराध्याचे वडील सैन्यात कामाला असल्यामुळे तिला लहान असल्यापासून वडिलांचा सहवास विशेष मिळाला नाही; परंतु याविषयी तिच्या मनात कोणतेही विचार नसतात. ‘तिने ती परिस्थिती स्वीकारली आहे’, असे जाणवते.

३. प्रतिदिन झोपतांना प्रार्थना करणे

आराध्या २ वर्षांपासून प्रतिदिन रात्री प.पू. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना करूनच झोपते. तिला याची कधीही आठवण करून द्यावी लागत नाही.’

(वरील लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (५.९.२०२१))


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक