बांगलादेशच्या दौर्‍यावर असणारा पाकिस्तानी क्रिकेट संघ सरावाच्या वेळी पाकचा झेंडा लावत असल्याने होत आहे विरोध !

सामने रहित करण्याची मागणी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ ३ ‘ टी-२०’ क्रिकेट सामने खेळणार आहे. यासाठी पाकचा संघ बांगलादेशात पोचला आहे. तेथे  सरावाच्या वेळी संघाने पाकचा झेंडा लावल्याने वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशमधील अनेक क्रिकेटप्रेमींनी ‘पाकिस्तानी संघाने जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत बांगलादेश स्वतंत्र्य होण्याच्या सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमाआधी राजकीय हेतूने हे कृत्य केले आहे’, असा आरोप केला आहे.

१. बांगलादेशी नागरिकांचे म्हणणे आहे, ‘अनेक देशांच्या क्रिकेट संघांनी बांगलादेशचा दौरा केला आहे; मात्र आजपर्यंत कुठल्याही संघाने सरावाच्या वेळी कधी त्यांच्या देशाचा झेंडा बांगलादेशच्या भूमीवर लावला नाही. पाकिस्ताननेच असे का केले ? त्यांना यामधून काय सिद्ध करायचे आहे ?’ पाकच्या या कृत्यावर सामाजिक माध्यमांतून टीका केली जात असून झेंडा काढण्याची मागणी केली जात आहे, तसेच पाकविरोधातील हे सामने रहित करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

२. याविषयी ‘पाकिस्तान क्रिकेट मंडळा’ने ‘गेल्या २ मासांपासून पाकिस्तानचा संघ सरावाच्या वेळी पाकचा झेंडा लावूनच सराव करत आहे’, असे सांगितले. तथापि या सर्व प्रकरणावर ‘बांगलादेश क्रिकेट मंडळा’ने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.