उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वैदेही दिनेश हळर्णकर ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गर्भारपण
‘गर्भारपणी एकदा मला ‘माझ्या गर्भात गणपति आहे’, असे वाटले. त्या वेळी गर्भाचा स्पर्शही मला मऊ आणि थंड असा जाणवत होता.
२. जन्मानंतर कु. वैदेहीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. जिज्ञासू वृत्ती : बालवाडीत जाऊ लागल्यावर वैदेहीने एकदा मला विचारले, ‘‘आई, आपण घरात चप्पल घालत नाही. मग शाळेत गेल्यावर (वर्गात) चप्पल का घालतो ?’’ या प्रश्नाचे उत्तर मला व्यवस्थित देता आले नाही.
२ आ. मनमोकळेपणा : वैदेही मनमोकळेपणाने सर्व गोष्टी सांगते. घरी कुणी अनोळखी व्यक्ती आली, तरी ती त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून त्यांना आपलेसे करते. शाळेत ती सर्वांशी चांगली वागते. घरात कुणी साधक आले, तर ती त्यांचे आदरातिथ्य करते. वैदेहीला साधकांमध्ये रहायला आवडते.
२ इ. कुटुंबियांना प्रेमाने साहाय्य करणे : ती मला घरातील सर्व कामांमध्ये साहाय्य करते. मध्यंतरी माझ्या सासूबाईंचा पाय सुजल्यामुळे दुखत होता आणि त्यांना चालता येत नव्हते. तेव्हा ती आजीला सांगायची, ‘‘आजी, माझा हात पकड, नाहीतर पडशील.’’
२ ई. साधनेची आवड असणे : वैदेही प्रतिदिन नामजप लिहिते. ती खेळतांना नामजप करते. ती आम्हाला नामजप आणि प्रार्थना यांची आठवण करून देते. माझ्याकडून एखादी चूक झाली किंवा माझा एखाद्या वस्तूला पाय लागला, तर ती मला ‘क्षमस्व म्हण’, असे सांगते. तिला सात्त्विक कपडे घालायला आवडतात.
२ उ. आध्यात्मिक स्तरावरील उपाय आवडीने करणे : ती शाळेत जाण्यापूर्वी अत्तर, कापूर आणि उदबत्ती यांचे उपाय करते.
२ ऊ. अहं अल्प असणे : शाळेतील एखादी मैत्रीण तिच्याशी बोलली नाही, तर ती स्वतः कमीपणा घेऊन तिच्याशी बोलते.
३. वैदेहीचे स्वभावदोष
हट्ट करणे, गांभीर्य नसणे आणि वक्तशीरपणाचा अभाव.’
– सौ. नयना दिनेश हळर्णकर (कु. वैदेहीची आई), म्हापसा, गोवा. (२३.२.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.