८ वर्षांनंतरही निर्णय प्रलंबित !
केंद्र सरकारने यासाठी लवकर पावले उचलावीत, अशी मराठीप्रेमींची अपेक्षा ! – संपादक
मुंबई, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून १६ नोव्हेंबर २०१३ या दिवशी केंद्र सरकारकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव पाठवण्यात आला होता. १६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी त्याला ८ वर्षे पूर्ण झाली; मात्र वर्ष २०१३ पासूनच्या केंद्र सरकारांनी आजपर्यंत यावर निर्णय घेतला नाही. याविषयी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे; मात्र यावरील कार्यवाहीविषयी केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला कळवलेले नाही. नुकत्याच झालेल्या संसदीय अधिवेशनात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय आल्यावर यावर निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. त्यावरील कार्यवाही कोणत्या टप्प्यात आहे ? याविषयी मात्र केंद्र सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ जून २०२१ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या वेळी केलेल्या विविध मागण्यांमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या विषयाचाही समावेश होता. याविषयी विद्यमान मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनीही नुकतेच केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री असतांना केंद्र सरकारला याविषयी पत्र पाठवले होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी तत्कालीन शासनाने वर्ष २०१३ मध्ये रंगनाथ पठारे समिती स्थापन केली होती. या समितीने याविषयीचा अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला. समितीने सादर केलेला अभ्यास आणि आवश्यक पुरावे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे सादर केले.
आतापर्यंत ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा !
आतापर्यंत देशात संस्कृत, तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम् आणि ओडिया या ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठीचे निकष !
अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी संबंधित भाषा प्राचीन असायला हवी. साहित्यामध्ये तिचे महत्त्वाचे योगदान असावे. ती भाषा स्वयंभू आणि स्वयंपूर्ण असावी, तसेच सध्याच्या नव्याने आलेल्या भाषेपेक्षा वेगळी असावी, असे निकष आहेत. कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यास त्या भाषेतील प्रतिभावंतांसाठी प्रतिवर्षी २ आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. त्या भाषेचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन यांसाठी केंद्राची स्थापना केली जाते, तसेच प्रत्येक विद्यापिठात त्या भाषेचे अध्ययन केंद्र स्थापन केले जाते.
अभिजात दर्जा म्हणजे काय ?श्रेष्ठ दर्जाच्या साहित्याची निर्मिती झालेल्या प्राचीन भाषेला अभिजात भाषा असे म्हणतात. अभिजनांची भाषा म्हणजे अभिजात ! अभिजात भाषा हा भारत शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा दर्जा आहे. हा दर्जा ज्या भाषेला दिला जातो, तिच्या विकासासाठी केंद्रशासनाकडून भरीव अनुदान मिळते. |