कर्णावती (गुजरात) येथे धार्मिक स्थळांजवळ आणि सार्वजनिक मार्गांवर मांसाहारी खाद्यपदार्थ विकण्यावर बंदी

प्रातिनिधिक छायाचित्र

कर्णावती (गुजरात) – येथील धार्मिक स्थळांजवळ आणि सार्वजनिक मार्गांवर मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री करण्यावर महानगरपालिकेने बंदी घातली आहे. यामुळे आता शाळा, महाविद्यालये, सभागृह, मंदिरे आदी ठिकाणी मांसाहारी पदार्थ विकता येणार नाहीत. गुजरातमध्ये यापूर्वी भावनगर, जुनागड, राजकोट आणि बडोदा महानगरपालिकांकडूनही असा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकांच्या खाण्याविषयी सरकारला कोणतीही समस्या नाही ! – मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल

राज्य सरकारला लोकांच्या खाण्याविषयी कोणतीही समस्या नाही, असे विधान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सार्वजनिक ठिकाणी मांसाहारची विक्री करण्यावर घालण्यात आलेल्या बंदीच्या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना केले. मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणारे आणि वाहतुकीला समस्या निर्माण करणारे फेरीवाले यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. याविषयी स्थानिक महानगरपालिका निर्णय घेऊ शकते.