आतापर्यंत केवळ २६ दोषी पोलिसांना शिक्षा
|
नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने पोलीस कोठडीत होणार्या मृत्यूंविषयीची आकडेवारी प्रसारित केली आहे. त्यानुसार गेल्या २० वर्षांत पोलीस कोठडीत १ सहस्र ८८८ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणांत वेगवेगळ्या राज्यांतील ८९३ पोलीस कर्मचार्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. त्यांतील ३५८ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले; परंतु गेल्या २० वर्षांत या प्रकरणी केवळ २६ पोलीस कर्मचार्यांना शिक्षा सुनावण्यात आली. वर्ष २००६ मध्ये सर्वाधिक ११ पोलीस कर्मचारी दोषी आढळले होते. यांतील ७ जण उत्तरप्रदेशातील तर ४ जण मध्यप्रदेशातील होते.
#ExpressFrontPage | The record assumes significance in the wake of the custodial death last Tuesday of a 22-year-old, Altaf, in Uttar Pradesh’s Kasganj after he was detained in the case of a minor girl from a Hindu family gone missing.https://t.co/BzngYcXGa4
— The Indian Express (@IndianExpress) November 16, 2021
१. वर्ष २०२० साली पोलीस कोठडीत ७६ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यांतील सर्वाधिक १५ प्रकरणे गुजरातमधील आहेत. मात्र या प्रकरणांत गेल्या वर्षात कुणालाही शिक्षा झालेली नाही.
२. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी घोषित केलेल्या आकडेवारीमध्ये ‘पोलिसांच्या कह्यात आणि कोठडीत मृत्यू’ची प्रकरणे दोन भागांत विभागली आहेत. ‘रिमांड’वर घेतलेल्या व्यक्ती आणि ‘रिमांड’वर न घेतलेल्या व्यक्ती, अशा दोन गटांचा यात समावेश आहे. ज्यांना अटक करण्यात आली; मात्र न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आलेले नसेल, अशा व्यक्ती ‘रिमांडवर न घेतलेल्या व्यक्ती’ असतात, तर ‘रिमांड’वर घेतलेल्या व्यक्तींमध्ये पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशानंतर कह्यात घेतलेल्या व्यक्तींचा समावेश असतो.
३. वर्ष २००१ पासून ‘रिमांडवर घेण्याअगोदरच’ १ सहस्र १८५ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद करण्यात आली, तर ७०३ जणांचा मृत्यू पोलिसांनी ‘रिमांड’वर कह्यात घेतल्यानंतर झाला.
४. गेल्या २ वर्षांच्या आकडेवारीनुसार पोलीस कोठडीतील ८९३ मृत्यूंपैकी ५१८ अशी प्रकरणे आहेत, ज्यात व्यक्तीला रिमांडवर घेतले गेले नव्हते.