शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

अंत्यदर्शनासाठी सहस्रो लोकांची गर्दी !

वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा पार्थिव देह १५ नोव्हेंबर या दिवशी त्यांच्या रहात्या घरी, पर्वती येथील पुरंदरे वाड्यात सकाळी ८ वाजता नेण्यात आला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

त्यानंतर येथील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या पार्थिव देहावर राष्ट्रीयध्वज पांघरण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या देहाला विद्युतदाहिनीत दहन करण्यात आले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी रायगड, राजगड, सिंधुदुर्ग अशा काही गडांवर नेल्या जाणार आहेत.