स्वारगेट एस्.टी. स्थानकावर खासगी बसना अनुमती !
पुणे – एस्.टी. महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एस्.टी. कर्मचार्यांनी राज्यात संप पुकारला आहे. कर्मचारी संप मागे घेण्यास सिद्ध नसल्याने एस्.टी. महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून महामंडळाने राज्यात ९१८, तर पुणे जिल्ह्यात २६ कर्मचारी निलंबित केले आहेत. राज्यात १२० पेक्षा अधिक एस्.टी. डेपोमध्ये संप चालू असल्याने एस्.टी.ला प्रतिदिन जवळपास कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांची लूट होऊ नये; म्हणून तसेच सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने खाजगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची अनुमती दिली आहे. त्यांनी एस्.टी.चेच दर आकारावेत अशा सूचनाही दिल्या आहेत; मात्र पुण्यातील खासगी वाहतूकदारांनी संपाला पाठिंबा देण्यासाठी खासगी बसेस आगाराच्या बाहेर न काढण्याचा आणि खासगी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.