‘नामजपाला घरून खूप विरोध असूनही साधिकेने नामजप कसा केला ? हे या लेखात दिले आहे. विरोध असला, तरी साधिकेप्रमाणे साधना केली, तर साधनेत जलद प्रगती होते. साधनेला विरोध करणार्या कुटुंबियांना पुष्कळ पाप लागते आणि त्यांना ते जन्मोजन्म भोगावे लागते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.४.२०२०)
१. घरातील व्यक्तींनी नामजपास तीव्र विरोध करणे
‘माझी आई नामजप करते. तिला साधनेसाठी घरातून पुष्कळ विरोध आहे. ती खोलीत एकटीच नामजपासाठी बसली, तरी तिला म्हणतात, ‘‘तू काय करत आहेस ? नामजप करू नकोस.’’ तिची भावजय म्हणते, ‘‘सारखे देव, देव करून काय होणार ? देवाचे नाव घ्यायचे नाही.’’ तिला (भावजयीला) माळ घेऊन नामजप केलेला आवडत नाही.
२. सर्वांच्या नकळत नामजप करता येण्यासाठी आईने केलेल्या विविध उपाययोजना
२ अ. आईने रात्री उठून तोंडावर पांघरुण घेऊन नामजप आणि प्रार्थना करणे : नामजप करतेय, हे कळू नये; म्हणून आई रात्री ३ वाजता उठून तोंडावर पांघरुण घेऊन नामजप करते. ती गुरुदेवांना प्रार्थना करते, ‘गुरुमाऊली, तुम्हीच मला शक्ती द्या आणि माझ्याकडून पुष्कळ नामजप करवून घ्या. माझी भक्ती आणि भाव तुमच्या चरणांपर्यंत पोचू दे. माझ्या मुखात शेवटच्या श्वासापर्यंत नाम राहू दे.’
२ आ. नामजप करण्यासाठी ती पहाटे फिरायला जाते.
३. अपरात्री जाग आल्यावर उठून फिरायला जाणे, मंदिरात बसून नामजप करणे आणि घरी आल्यावर मुलगा पुष्कळ बोलल्याने गुरुदेवांजवळ क्षमायाचना करणे
एकदा आई घड्याळात न पहाता रात्री १२ वाजता फिरायला गेली. तिने मंदिरात बसून थोडा वेळ नामजप केला. तेव्हा कुत्री पुष्कळ भुंकत असल्याने तिला थोडी भीती वाटली. तिला वाटले, ‘५ वाजले, तरी अजून कुणी का दिसत नाही ?’ मागे-पुढे बघत बघत ती घरी आली आणि दार उघडले, तर दारात तिचा मुलगा उभा होता. त्याने विचारले, ‘‘आई, एवढ्या रात्री कुठे गेली होतीस ? घड्याळात ३.३० वाजले आहेत.’’ तो तिला पुष्कळ बोलला. तिने सर्व ऐकून घेतले आणि खोलीत जाऊन गुपचुप पडून राहिली. ती देवाशी बोलत राहिली आणि परात्पर गुरुदेवांची क्षमा मागितली, ‘चुकले माझे. मला योग्य वेळीच जाग येऊ दे आणि माझा नामजप चांगला होऊ दे.’ त्यानंतर पुन्हा असे कधी घडले नाही.’
४. अनुभूती
परात्पर गुरुमाऊली, तुम्ही अनुभूतीतून तिला देवाचे दर्शन घडवलेत. आईचे कुलदैवत खंडोबा आहे. एकदा तिला खंडोबा कुत्र्याच्या रूपात घरापर्यंत पोचवायला आला आणि ती सुखरूप घरी आली.’
– एक साधिका
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |