इक्वाडोरमध्ये कारगृहातील बंदीवानांच्या दोन गटांतील हिंसाचारात ६८ जणांचा मृत्यू

क्विटो (इक्वाडोर) – इक्वाडोरमधील सर्वांत मोठे कारागृह असलेल्या ‘लिटोरल पेनिटेंशरी’मध्ये १३ नोव्हेंबर या दिवशी अमली पदार्थांशी संबंधित अटकेत असलेल्या बंदीवानांच्या दोन गटांत झालेल्या हिंसाचारात ६८ बंदीवान ठार झाले, तर २५ जण घायाळ झाले. या वेळी गोळीबार करण्यात आला. या हिंसाचाराच्या वेळी बराचवेळ कारागृहातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती, अशी माहिती कारागृहातील अधिकार्‍यांनी दिली. गुआस प्रांतातील गव्हर्नर पाब्लो अरोसेमेना यांनी सांगितले की, हा हिंसाचार जवळपास ८ घंटे चालू होता. या वेळी बंदीवानांनी ‘डायनामाईट’च्या साहाय्याने एक भिंत फोडण्याचा प्रयत्न केला, तसेच जाळपोळ केली.