गंगावेस – शुक्रवार गेट – शिवाजी पूल वाहतूक सुरळीत करा ! – आखरी रस्ता कृती समितीचे निवेदन

वाहतूक निरीक्षक सौ. स्नेहा गिरी  (डावीकडे) यांना निवेदन देतांना आखरी रस्ता कृती समितीचे कार्यकर्ते

कोल्हापूर, १४ नोव्हेंबर – शिवाजी पूल ते गंगावेस येथील रस्त्याचे काम गेली ४ वर्षे आंदोलनाच्या रेट्यामुळे चालू आहे. या मार्गावर ठिकठिकाणी ‘बॅरिकेट’ लावल्याने लोकांना दुचाकी, चारचाकी वाहने चालवतांना पुष्कळ कठीण जात आहे. या मार्गावर शववाहिका, ऊस ट्रॅक्टर अडकण्याचे प्रकारही घडले आहेत. तरी गंगावेस आणि शिवाजी पूल येथे रस्ता बंदचे फलक लावावेत, तसेच गंगावेस – शुक्रवार गेट – शिवाजी पूल या मार्गावरील वाहतूक सुरळीत करावी, या मागणीचे निवेदन आखरी रस्ता कृती समितीच्या वतीने वाहतूक निरीक्षक सौ. स्नेहा गिरी यांना १३ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी कृती समितीच्या वतीने किशोर घाटगे, आर्.एन्. जाधव, रियाज बागवान, सनी अतिग्रे उपस्थित होते.

निवेदनानंतर वाहतूक निरीक्षकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी केली आणि कृती समितीच्या आवाहनानुसार वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.