|
श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
मुंबई – नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय हे मुंबईतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय उद्यानाप्रमाणे विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी प्राणीसंग्रहालयात दर्जेदार ‘प्राण्यांची सवारी’ विकसित करण्यात येणार आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी ‘दुबई एक्स्पो’ या नावाने दुबई दौरा करण्याचा प्रस्ताव वनविभागाने सिद्ध केला असून हा प्रस्ताव १२ नोव्हेंबर या दिवशी मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागातील एका अधिकार्यांनी दिली. राज्यशासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हे प्राणीसंग्रहालय विकसित केल्यास हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय ठरणार आहे.
१. वनविभागाकडून मान्यतेसाठी हा प्रस्ताव प्रथम गृहविभागाकडे पाठवला होता. गृहविभागाकडून शासकीय आदेशाप्रमाणे यावर कार्यवाही करण्याचा शेरा मारून प्रस्ताव वनविभागाकडे पाठवण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे.
२. या प्रस्तावानुसार महाराष्ट्रातील ५ अधिकारी दुबई येथे जाऊन प्राण्यांच्या सवारीची माहिती घेणार आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये व्यावसायिक पद्धतीने प्राण्यांची सफारी विकसित करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेसह अन्य राष्ट्रांतील या क्षेत्रातील व्यक्ती ‘दुबई एक्स्पो’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
३. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातही प्राण्यांची सवारी विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. या दौर्यामध्ये ४ वन अधिकारी आणि एका सचिव दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश असणार आहे. यामधील अधिकार्यांची नावेही वनविभागाकडून निश्चित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांची संमती मिळाल्यास यावर पुढील कार्यवाही होईल.
४. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला आंतरराष्ट्रीय दर्जा असूनही मागील अनेक वर्षे या प्राणीसंग्रहालयाचा म्हणावा तसा विकास करण्यात आलेला नाही. जानेवारी २०२१ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्राणीसंग्रहालयात प्राणी सवारीच्या उपक्रमाचे उद्घाटन केले. यापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्याकडे वन खाते होते; मात्र त्यांना पदावरून हटवल्यापासून हे खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.