पिंगुळी येथील लोककलाकार परशुराम गंगावणे यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (उजवीकडे) परशुराम गंगावणे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करतांना

सिंधुदुर्ग – नवी देहली येथील राष्ट्रपती भवनात ९ नोव्हेंबर या दिवशी भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘पद्मश्री पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील लोककलाकार श्री. परशुराम विश्राम गंगावणे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘ठाकर आदिवासी लोककला आंगण’च्या माध्यमातून लोककलाकार गंगावणे ‘कळसूत्री बाहुल्या’ ही लोककला गेली अनेक वर्षे जोपासत आहेत. या योगदानासाठी त्यांना वर्ष २०२१ चा ‘पद्मश्री पुरस्कार’ घोषित झाला होता. त्याचे वितरण ९ नोव्हेंबर या दिवशी देहली येथे करण्यात आले. या वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आदी मान्यवरांसह पद्मश्री गंगावणे यांच्या पत्नी सौ. कविता गंगावणे, मुलगा एकनाथ आणि चेतन गंगावणे हेही उपस्थित होते.

या सोहळ्यानंतर पद्मश्री गंगावणे यांनी नवी देहली येथे खासदार सुरेश प्रभू यांची भेट घेतली. या वेळी खासदार प्रभू यांनी पद्मश्री गंगावणे यांचा सत्कार केला.

१३ नोव्हेंबरला ‘पद्मश्री’ गंगावणे यांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटना, पिंगुळी ठाकर समाज ग्रामस्थ मंडळ आणि ‘ठाकर आदिवासी कला आंगण, पिंगुळी’ यांच्या वतीने कुडाळ शहर ते पिंगुळी येथील पद्मश्री गंगावणे यांच्या घरापर्यंत भव्य फेरी काढून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या वेळी पारंपरिक वेशभूषांसह ठाकर समाजाच्या विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.