‘मी काही आठवड्यांपासून हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करत आहे. पुष्कळ दिवसांनी मी गायनाचा सराव करत असूनही देवाच्या कृपेने माझे खर्जातील (मंद्र सप्तकातील (टीप १)) स्वर लागत असल्याचे मला लक्षात आले. (खर्जातील स्वर लागणे कठीण असते. सराव नसेल, तर खर्जातील स्वर लागत नाहीत.) तेव्हा मी त्या प्रत्येक रागाला अनुभवत असल्याचे मला जाणवत होते. रागांचे गायन करतांना गुरुकृपेने मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
टीप १ – मंद्र सप्तक हे गायन-वादनात प्रचलित असलेल्या तीन सप्तकांतील पहिले सप्तक आहे. मंद्र सप्तकातील स्वर गातांना निघणारा नाद हा शरिराच्या नाभी स्थानातून उत्पन्न झालेला असतो.
१. विविध राग गातांना आलेल्या अनुभूती
१ अ. राग – भूपाली
१. मी या रागाचा जसजसा स्वरविस्तार करत होते, तसतसे स्वर हलके वाटून ‘मी त्यांच्याशी खेळत आहे,’ असे मला जाणवले.
२. स्वरविस्तार झाल्यावर या रागाच्या धृपदाचे (टीप २) आलाप (टीप ३) घेत असतांना मला स्वरांभोवती तेज दिसले.
टीप २ – हा शास्त्रीय गायनातील गंभीर आणि जोरकस प्रकार आहे. भारतीय संगीतात ख्याल गायकी प्रचारात येण्यापूर्वी हे संगीत धृपद-धमार गायकीतच सामावलेले होते. धृपदाचे काव्य वीर, शांत, तसेच भक्तीरस पूर्ण असते.
टीप ३ – संथ गतीत केलेला स्वरविस्तार
३. धृपदाचे गायन करतांना काही वेळाने मी पांढर्या प्रकाशाकडे खेचली गेले आणि शेवटी मला स्वतःतच लख्ख प्रकाश दिसला. त्या प्रकाशामुळे मला माझे डोळे उघडता येत नव्हते. त्या वेळी मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘भूपाली’ या रागाचा रंग पांढरा आहे’, असे मला वाटले.
४. हा राग म्हणतांना ‘मी हलकी होऊन हवेत तरंगत आहे आणि या रागामध्ये वायुतत्त्व आहे’, असे मला जाणवले.
५. या रागातील ‘ॐ नमः शिवाय…।’ हे भक्तीगीत म्हणत असतांना मला भगवान शंकराचे दर्शन झाले. मी हिमालयात शिवाजवळ बसून गात असल्याचे जाणवून मला थंडावा जाणवला.
१ आ. राग – मालकंस
१. हा राग भक्तीरसप्रधान राग आहे. या रागाचा स्वरविस्तार करत असतांना माझा भाव जागृत होत होता.
२. या रागाच्या धृपदाच्या गायनानंतर मला पांढरे वस्त्र परिधान केलेली स्त्री नृत्य करतांना दिसली. (‘ती रागाची देवता असावी’, असे मला वाटले.)
३. या रागाच्या बंदिशीतील (टीप ४) ताना (टीप ५) जलद गतीत म्हणतांना चैतन्य वाढत जाऊन मी पूर्ण चैतन्यमय झाल्याचे मला जाणवले. त्या वेळी ‘ताना मारक तत्त्वाप्रमाणे कार्य करत आहेत’, असे मला जाणवले.
टीप ४ – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा द्रुत लयीत गातात.
टीप ५ – द्रुत (जलद) गतीत केलेला स्वरविस्तार
४. या रागाच्या सरावाच्या वेळी मला केशरी रंगाचे चैतन्य माझ्या सभोवताली जाणवत होते. ‘या रागाचा रंग केशरी असावा’, असे मला वाटले. या वेळीही गात असतांना मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. मी मालकंस रागाच्या स्वरांशी एकरूप झाल्याचे मला जाणवले.
५. या रागातील ‘संतनके परम संत…’ हे भक्तीगीत म्हणतांना मला ध्यानस्थ मारुतीचे दर्शन होऊन शांत वाटले.
१ इ. राग – यमन
१. हा राग म्हणत असतांना मी स्वरांशी खेळत असल्याचे मला जाणवले.
२. हा राग म्हणतांना मला आनंद आणि चैतन्य जाणवत होते. ‘यमन’ हा राग कुठल्याही प्रहरी गाऊ शकतो; म्हणून हा सदाबहार आणि आनंददायी राग आहे.
३. या रागातील ‘श्रीरामचंद्र कृपालु भज मन…’ हे भजन म्हणत असतांना भजनांच्या ओळींच्या अर्थाप्रमाणे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या प्रभु श्रीरामाला मी प्रत्यक्ष जवळून अनुभवत असल्याचे मला जाणवले. हे भजन म्हणत असतांना मला अधूनमधून श्रीराम आणि श्रीरामरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप दिसत होते. भजन म्हणून झाल्यावर शांत वाटून ‘केवळ श्रीरामालाच आळवत रहावे’, असे मला वाटत होते.
१ ई. राग – वृंदावनी सारंग
१ ई १. या रागाचे स्वर, तसेच बंदीश (टीप ४) म्हणत असतांना मला आनंद जाणवत होता. त्या वेळी माझे शरीर हलके झाले होते.
१ ई २. हा राग म्हणत असतांना मला सूक्ष्मातून हरीण सभोवताली बागडत असल्याचे दिसले.
१ ई ३. ‘मी पिवळ्या प्रकाशात आहे’, असे मला दिसले. ‘या रागाचा रंग पिवळा असावा’, असे मला वाटले.
१ ई ४. भक्तीगीत म्हणत असतांना पिवळ्या प्रकाशात श्रीहरीचे दर्शन होणे, आनंदात वाढ होऊन नृत्य करणे आणि सूक्ष्मातून वनात असून पाऊस पडत असल्याचे जाणवणे : या रागातील ‘हरि म्हणा तुम्ही गोविंद म्हणा…’ हे भक्तीगीत म्हणत असतांना मला पिवळ्या प्रकाशात साक्षात् श्रीहरीचे दर्शन झाले. मला या अवस्थेतून बाहेर यावेसे वाटत नव्हते. माझा श्रीकृष्णाच्या समवेतचा आनंद पुष्कळ वाढला होता. नंतर मी आनंदाच्या स्थितीत श्रीकृष्णाच्या ‘आज राधाको श्याम याद आ गया…’ या गाण्यावर प्रत्यक्ष नृत्य केले. त्या वेळी मला नृत्य थांबवावेसे वाटत नव्हते. अर्धा घंटा नृत्य केल्यावर मी सेवा करण्यासाठी बसले असतांना अकस्मात् मला सूक्ष्मातून ‘मी वनातील झाडाखाली आहे. तिथे पाऊस पडत आहे आणि माझ्याजवळ एक हरीण आले आहे’, असे मला जाणवले.
(सौ. अनघा जोशी : हा रागाचा परिणाम असावा का ?
कु. तेजल पात्रीकर : संगितातील आपतत्वाशी, म्हणजेच पाण्याशी संबंधित मल्हार अंगाच्या रागांच्या (उदा. मिया मल्हार, मेघमल्हार इ.) उत्पत्तीचा जनक ‘वृंदावनी सारंग’ आहे. त्यामुळे साधिकेला वनातील पावसाळी वातावरणाची, म्हणजेच आपतत्वाची अनुभूती आली. भारतीय संगीतात प्रत्येक रागाचा प्रकृतीशी संबंधित गहन अभ्यास केलेला आहे. राग आणि त्याचे तत्त्व, असे शास्त्र लिहून ठेवणार्या ऋषिमुनींच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. हीच भारतीय कलेची विशेषता आहे.)
१ उ. राग – दुर्गा
१. या रागाची श्रीकृष्णाशी संबंधित ‘श्याम हरि बोल बोल…’ ही बंदीश म्हणत असतांना मला पहिल्या ओळीपासूनच आनंद जाणवला आणि तो वाढत जाऊन त्या आनंदातच मी प्रत्यक्ष नृत्य केले.
२. या वेळी मी श्रीकृष्णाच्या समवेत नृत्य करत असल्याचे मला जाणवले.
१ ऊ. राग – भैरवी
१. या रागात रे (रिषभ), ग (गंधार), ध (धैवत) आणि नि (निषाद) हे स्वर कोमल (टीप ६) असल्याने हा राग आर्तभाव जागृत करणारा आहे.
टीप ६ – जे स्वर आपली मूळ जागा सोडून अल्प उंचीवर येतात; परंतु मागील स्वरापेक्षा अधिक उंचीवर असतात, त्यांना ‘कोमल स्वर’ असे म्हणतात. म्हणजेच ‘ग’ हा स्वर आपल्या मूळ जागेवरून अल्प उंचीवर आला; परंतु त्याच्या आधीच्या स्वरापेक्षा, म्हणजे ‘रे’ या स्वरापेक्षा अधिक उंचीवर राहिला, तर तो ‘कोमल गंधार’ म्हणून ओळखला जाईल, म्हणजेच कोमल गंधाराची जागा शुद्ध ‘रे’ आणि शुद्ध ‘ग’ यांच्या मध्यभागी आहे.
२. हा भक्तीरसप्रधान राग असल्यामुळे या रागाचा स्वरविस्तार करतांना मी त्या आर्त स्वरांत डुंबत असल्याचे मला जाणवत होते.
३. या रागातील ‘भवानी दयानी…’ ही देवीची बंदीश म्हणत असतांना या बंदिशीत मला देवीची प्रचंड शक्ती जाणवली. गायनाच्या अंती मला देवीच्या सुंदर रूपाचे दर्शन झाले. त्या वेळी मला माझे संपूर्ण शरीर आतून चैतन्यमय झाल्याचे जाणवले. मला या भावावस्थेतून बाहेर यावेसे वाटत नव्हते.
१ ए. वरील रागांचे गायन करतांना ‘मी प्रत्येक रागाच्या आत गेले आहे आणि मी गायन करत नसून स्वतःकडे तटस्थपणे बघत आहे’, असे मला जाणवत होते.
२. श्री गणेशाचे भक्तीगीत म्हणतांना आलेल्या अनुभूती
अ. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे…’ हे गीत म्हणत असतांना माझा श्री गणेशाविषयीचा भाव दाटून आला.
आ. मला ‘ॐ कारा’भोवती प्रकाश दिसला आणि ते चैतन्य माझ्याकडे येत असल्याचे जाणवले. त्या वेळी मला शांत वाटले.
३. वरील अनुभूतींचे टंकलेखन करतांना आलेली अनुभूती : या अनुभूतींचे टंकलेखन करत असतांना मला सप्तस्वर सप्तरंगांत दिसले. त्यानंतर मला कवितेचे पुढील बोल सुचले.
संपूर्ण देह, चित्त संगीत-साधनामय होवो ।
या स्वरसाधनेने माझी मी न राहो ।। १ ।।
या संगीत-साधनेने देहे समष्टी सेवा घडो ।
श्री गुरुचरणी हा जीव समर्पित होवो ।। २ ।।
‘माझी पात्रता नसतांना श्री गुरुकृपेने सुरांतील चैतन्याच्या अनुभूती मला अनुभवता आल्या’, याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. अनघा जोशी (बी.ए. (संगीत)), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१०.२०२१)
नामजप करतांना स्वतःच्या आत तानपुर्याचा नाद ऐकू येणे आणि मन एकाग्र होणे‘मी ‘निर्विचार’ हा नामजप करत असतांना मला माझ्या आत तानपुरा चालू असल्याचे जाणवले. नामजपाच्या ठिकाणी मला तानपुर्याचाच नाद ऐकू येत होता. त्या नादामुळे माझे मन एकाग्र होत होते. संपूर्ण नामजप होईपर्यंत तो नाद आत चालू असल्याचे मला जाणवले.’ – सौ. अनघा जोशी (बी.ए. (संगीत)), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१०.२०२१) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |