|
मुंबई – भात नीट शिजला नाही, तसेच तांदूळ शिजवतांना ते कच्चे राहिले, तर असा भात खाऊन कर्करोगाचा धोका संभवतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.
१. इंग्लडमधील क्वीन विश्वविद्यालयाने केलेल्या अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे की, मातीत असलेले औद्योगिक विषारी घटक आणि कीटकनाशकांमधील रसायन हे तांदळात असण्याची शक्यता सध्या अनेक पटींनी वाढली आहे. अशा रासायनिक घटकांनी दूषित तांदळाचा भात खाल्ल्यास ‘आर्सेनिक’ या विषारी घटकाची बाधा होते. त्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
२. कॅलिफोर्नियामध्ये तांदळावर केलेल्या अभ्यासात काही महिलांचे निरीक्षण करण्यात आले. हा अभ्यास महिलांना होणारा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि त्याच्याशी निगडित धोका यांविषयाचा होता. या अभ्यासात ९ सहस्र ४०० महिलांमध्ये स्तनांचा आणि फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचे आढळून आले. त्याला तांदळातला ‘आर्सेनिक’ हा घटक कारणीभूत ठरला.
३. अभ्यासक सांगतात की, ‘आर्सेनिक’ हे खनिजात असलेले एक रसायन आहे. या घटकाचा उपयोग किटकनाशकांमध्ये केला जातो, तसेच अनेक देशांत भूमीतील पाण्यात आर्सेनिक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अन्न किंवा पाणी यांच्याद्वारे हे घटक आपल्या शरिरात जातात आणि उलट्या, पोटदुखी, डायरिया, कर्करोग यांसारखे आजार होतात. सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या अनेक भागांतील तांदळात आर्सेनिकचे प्रमाण आढळते. तांदूळ जर नीट शिजवून खाल्ला नाही, तर शिजवलेल्या भातातही हे घटक शिल्लक रहातात आणि आरोग्यास धोका निर्माण करतात.
तांदूळ शिजवतांना घ्यायची काळजी !
तांदळात आढळणारा ‘आर्सेनिक’ हा घटक भाताद्वारे आपल्या पोटात जाऊ नये, यासाठी भात करण्यापूर्वी तांदूळ केवळ ३ वेळा पाण्यात धुवून घेणे पुरेसे नाही, तर तांदूळ पाण्यात भिजत घालणेही महत्त्वाचे आहे. तांदळातील आर्सेनिकचा पूर्ण निचरा होण्यासाठी सकाळी भात करायचा असेल, तर रात्री तांदूळ भिजवणे आवश्यक आहे.
क्वीन्स विश्वविद्यालयाच्या अभ्यासातून समोर आले की, रात्री तांदूळ भिजत घालून सकाळी त्याचा भात केला, तर यामुळे तांदळातील ‘आर्सेनिक’ घटक ८० टक्के न्यून होतात. या निष्कर्षापर्यंत पोचतांना त्यांनी काही प्रयोगही केले. त्यातील एक प्रयोग म्हणजे २ भाग पाणी आणि १ भाग तांदूळ घेऊन तो शिजवला गेला. दुसर्या पद्धतीत ५ भाग पाणी आणि १ भाग तांदूळ घेतले. भात शिजतांना त्यातील अधिकचे पाणी काढून टाकले असता भातामधील आर्सेनिक घटक निम्म्यावर आलेला आढळला.
जर फारच घाई असेल आणि भात जेवणात हवा असेल, तर अशा वेळेस तो न्यूनतम ३ ते ५ घंटे भिजवायलाच हवा. अशा प्रकारे तांदूळ धुवून भिजत घातल्याने तांदळातील आर्सेनिकसारखे विषारी घटक निघून जातात. अशा तांदळाचा भात खाण्यास सुरक्षित असतो.