अफगाणिस्तानच्या प्रकरणी भारताकडून आज ८ देशांची बैठक

  • बैठकीस अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला मान्यता न देणार्‍या देशांचा समावेश

  • चीन आणि पाक यांचा बैठकीत सहभागी होण्यास नकार

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

नवी देहली – भारताने अफगाणिस्तानच्या प्रकरणी १० नोव्हेंबर या दिवशी विशेष आंतरराष्ट्रीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भारतासह इराण, रशिया, उज्बेकिस्तान, कजाकिस्तान, तुर्केमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान या देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे निमंत्रण मिळूनही पाकिस्तान आणि चीन यांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. चीनने या बैठकीची वेळ नियोजित कार्यक्रमात बसत नसल्याचे कारण दिले आहे. या बैठकीचे अध्यक्ष भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल असणार आहेत.

या बैठकीचे अफगाणिस्तानला निमंत्रण देण्यात आलेले नाही. याविषयी सांगण्यात आले की, बैठकीत सहभागी होणार्‍या ८ देशांपैकी कुणीही अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला मान्यता दिलेली नाही. भारतानेही अद्याप तालिबानी सरकारला मान्यता दिलेली नाही.