पणजी, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात भाजप सलग तिसर्यांदा सत्तेवर येणार असल्याचा भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले. ख्रिस्ती नववर्षाच्या प्रारंभी देशातील ५ राज्यांच्या निवडणुका होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ७ नोव्हेंबर या दिवशी झाली. नवी देहली येथे ‘हायब्रीड’ पद्धतीने (प्रत्यक्ष सहभाग आणि ‘ऑनलाईन’ स्वरूपात सहभाग याला ‘हायब्रीड’ पद्धत म्हणतात) झालेल्या या बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीत एकूण ३४२ सदस्यांनी सहभाग घेतला. यामध्ये गोव्यातील ७ नेत्यांचा समावेश होता.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर सध्या एका दौर्यावर असल्याने ते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत, तर बैठकीत एक निमंत्रित म्हणून सहभागी झालेले आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आरोग्यविषयक समस्येमुळे बैठकीतून मध्येच उठून गेले. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे पुढे म्हणाले,‘‘आरोग्यमंत्री विश्वजीत राणे बैठकीला २ घंटे उपस्थित होते आणि ते आरोग्यविषयक समस्येमुळे नंतर बैठकीतून उठून गेल्याने कोणताच वाद निर्माण झालेला नाही.’’ वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी‘आप’ आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामुळे भाजपवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले.
‘मगोप’ समवेत युती करण्यासाठी चर्चा चालू
‘मगोप’शी निवडणूकपूर्व युती करण्यासाठी भाजप इच्छुक आहे. भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे या अनुषंगाने ‘मगोप’च्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. आतापर्यंत त्यांच्या बैठकाही झालेल्या आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.