‘२१.८.२०२० या दिवशी माझी मुलगी कु. ऋग्वेदश्री (वय १० वर्षे) हिने मातीची श्री गणेशमूर्ती बनवली. श्री गणेशमूर्ती बनवतांना तिला अतिशय आनंद मिळाला, जो तिला शब्दांत व्यक्त करता येत नाही. श्री गणेशमूर्तीच्या वर असलेली छत्री, त्याच्या डोक्यावर असलेला मुकूट आणि चरणांवर वाहिलेले गुलाबाचे फूल हेही तिने बनवले आहे.’ – सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई (२३.८.२०२०)
कु. ऋग्वेदश्री हिच्यातील उत्कट भावामुळे तिने बनवलेल्या मूर्तीकडे पाहून भावजागृती होणे
‘मूर्तीकला’ ही ६४ कलांमधील एक कला आहे. ईश्वरप्राप्तीच्या अनेक साधनांपैकी ‘कला’ हे ईश्वरप्राप्तीचे एक साधन आहे. कोणत्याही कलेचे शिक्षण न घेता केवळ देवाप्रती असणार्या उत्कट भावाच्या साहाय्याने साधक कलाकृती साकारतात. उत्कट भावामुळे लहान वयातच प्रतिभा जागृत झालेली असल्यामुळे देवाला आळवण्यासाठी विविध कलांच्या माध्यमातून आपला भाव प्रकट करतात.
कु. ऋग्वेदश्री हिने बनवलेल्या मातीच्या श्री गणेशमूर्तीकडे पाहून भावजागृती होते. श्री गणेशमूर्तीचे डोळे किंवा मुखावरील हावभाव जिवंत दिसत आहेत. त्यामुळे मनाला आनंद जाणवतो.’ – कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.८.२०२०)