प्रत्येक भारतीय दीपावलीच्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सैनिकांना कायम अनेक शुभेच्छा देत राहील ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – मी आज पुन्हा तुमच्यामध्ये आलो आहे. आज पुन्हा तुमच्याकडून नवी ऊर्जा, आशा आणि विश्‍वास घेऊन जाणार आहे. मी या ठिकाणी एकटा आलेलो नाही, मी १३० कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. प्रत्येक भारतीय दीपावलीच्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तुम्हाला कायम अनेक शुभेच्छा देत राहील, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. नौशेरा सेक्टर येथे दिवाळी साजरी करतांना ते बोलत होते. या वेळी त्यांनी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, तुम्ही भारतमातेचे सुरक्षाकवच आहात. तुमच्या सर्वांमुळेच आम्ही देशवासीय शांतपणे झोप घेऊ शकतो आणि सणासुदीच्या कालावधीत आनंदातही रहातो. मी प्रत्येक दिवाळी तुमच्या समवेत म्हणजेच सीमेवर देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांसमवेत साजरी करतो.