कार्तिक वारीसाठी ६ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत २४ घंटे मुखदर्शन ! – मंदिर समितीचा निर्णय

विठ्ठल मंदिर, पंढरपूर

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १ नोव्हेंबर (वार्ता.) – मागील १८ मासांपासून वारकरी संप्रदायाच्या ६ महत्त्वाच्या यात्रा कोरोनाच्या संसर्गामुळे रहित झाल्या आहेत. यंदा १५ नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी यात्रा असून शासनाकडून यंदा कार्तिकी यात्रा भरवण्याचे संकेत मिळाल्याने मंदिर प्रशासनाने नियोजन चालू केले आहे. ३१ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत ‘कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रा घ्यावी’, असा ठराव जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवला आहे. या यात्रेसाठी ६ नोव्हेंबर या दिवशी ‘देवाचा पलंग’ निघणार असून ६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी २४ घंटे खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

यात्रेला येणार्‍या भाविकांना लसीकरणाची कोणतीही अट न घालण्याचा निर्णय बैठकीत झाला असून मुखपट्टी आणि सामाजिक अंतराचे नियम मात्र पाळले जाणार आहेत. मंदिर समितीचा हा ठराव जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवला जाणार असून यानंतर शासन यात्रेविषयी अंतिम निर्णय जाहीर करेल. गेल्या २ वर्षांपासून यात्रा न झाल्याने यंदा कार्तिकीला ८ ते १० लाख वारकरी येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने मंदिर प्रशासनाने पूर्वसिद्धता करण्याच्या सूचना दिल्या आहेत.