दळणवळण बंदीच्या काळात कोरेगाव (सातारा) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. मंजुषा म्हेत्रे (वय १५ वर्षे) हिने बालसंस्कारवर्गाच्या माध्यमातून केलेले समष्टी साधनेचे प्रयत्न !
‘कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी होती. त्यामुळे सर्व नागरिक घरात बसून होते. कोरोनामुळे जनतेमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. अशा स्थितीत समाजाला भयमुक्त करण्यासाठी सनातन संस्था प्रयत्न करत आहे. सनातन संस्थेकडून सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, शंकानिरसन, धर्मशिक्षण आदींच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन करणे चालू आहे. हे ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील बालसाधिका कु. मंजुषा मुकुंद म्हेत्रे हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
१. ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक आदींना बालसंस्कारवर्गाचे महत्त्व सांगून तो भ्रमणभाषद्वारे ऐकण्यास प्रवृत्त करणे
कु. मंजुषाने ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, साधक आणि नातेवाईक यांना संपर्क केला. त्यांना बालसंस्कारवर्गाचे महत्त्व सांगितले आणि ‘सनातनचे बालसंस्कारवर्ग’ ऐकण्यासाठी घरातील लहान मुलांना भ्रमणभाषद्वारे जोडून देण्यास सुचवले. प्रारंभी ३ मुलांनी बालसंस्कारवर्ग ऐकला. आता ही संख्या वाढत जाऊन २१ झाली आहे.
२. बालसंस्कारवर्गातील विषय ऐकून मुलांनी साधनेला केलेला आरंभ !
कु. मंजुषाने बालसंस्कारवर्ग चालू होण्यापूर्वी आणि तो चालू झाल्यावर सर्वांना संपर्क केला. त्या वेळी बालसंस्कारवर्ग ऐकणारे पालक आणि मुले यांनी त्यांचा उत्साह दुणावल्याचे सांगितले. एका बालसाधिकेने नामजपाच्या वेळा विचारून घेऊन प्रतिदिन त्याप्रमाणे नामजप करण्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी जाणून घेऊन ‘स्वयंसूचना कशा द्यायच्या ? सारणी लिखाण कसे करायचे ?’, यांविषयीही जाणून घेतले. एका बालसाधिकेने व्यष्टी आढावा द्यायलाही चालू केले आहे.
‘हे गुरुदेवा, तुम्हीच मंजुषाकडून ही सेवा करवून घेतली. याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. मुकुंद म्हेत्रे (कु. मंजुषाचे वडील), कोरेगाव, सातारा. (१२.४.२०२०)
(कु. मंजुषा म्हेत्रे (वय १५ वर्षे) हिने केलेले प्रयत्न सर्वांसाठीच अनुकरणीय असून स्वतः पुढाकार घेऊन अशी कृती करणार्या मंजुषाचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – संकलक)