सातारा नगरपालिकेत १६ नगरसेवक वाढणार !

सातारा, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा नगरपालिकेत १६ नगरसेवकांची वाढ होणार आहे. शहराची सीमावाढ आणि नगरपालिकांच्या किमान सदस्यसंख्येत १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यामुळे सातारा पालिकेची सदस्य संख्या ५६ वर जाण्याची शक्यता आहे.

१. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि नागरी विकास योजनांचा वाढलेला वेग विचारात घेऊन नगरपालिकेतील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

२. राज्यात सध्या नगरपालिकांमधील सदस्यसंख्या किमान १७ आणि कमाल ६५ एवढी आहे. वर्ष २०११ मध्ये जनगणना झाल्यावर त्या आकडेवारीनुसार पालिका सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली. कोरोना संसर्गामुळे वर्ष २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग गृहित धरून पालिका सदस्यसंख्या १७ टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

३. ‘अ’ वर्ग नगरपालिकांसाठी सदस्यसंख्या किमान ४० कमाल ७५, ‘ब’ वर्ग नगरपालिकांसाठी सदस्यसंख्या किमान २५, कमाल ३७, ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी सदस्यसंख्या किमान २०, कमाल २५ ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

४. सातारा नगरपालिकेची सदस्यसंख्या सध्या ४० आहे. सीमावाढ झाल्यामुळे यापूर्वी ८ नगरसेवक वाढले. राज्य मंत्रीमंडळाच्या १७ टक्के वाढीमुळे अजून ८ नगरसेवक वाढणार आहेत. त्यामुळे सातारा नगरपालिकेत अजून १६ नगरसेवक वाढणार असून एकूण ५६ नगरसेवक होणार आहेत.