काश्मीरचा उल्लेख ‘भारताने कह्यात घेतलेले काश्मीर’ असे केल्याने जे.एन्.यू.मधील वेबिनार प्रशासनाकडून रहित !

वेबिनार रहित करणे, ही वरवरची उपाययोजना झाली. असे कृत्य करणार्‍यांना कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात (‘जे.एन्.यू.’त) २९ ऑक्टोबर या दिवशी ‘सेंटर फॉर वुमन्स स्टडीज’कडून एका वेबिनारची प्रसिद्धी करतांना काश्मीरचा उल्लेख ‘भारताने कह्यात घेतलेले काश्मीर’ असा करण्यात आला. त्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. याची माहिती जे.एन्.यू. प्रशासनाला मिळताच हा वेबिनार प्रारंभ होण्यापूर्वीच रहित करण्यात आला. प्रशासनाने आता याविषयी चौकशीचा आदेश दिला आहे. या प्रकरणी आयोजनकर्त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी अभाविपने केली आहे.

त्रिपुरा येथील हिंसाचाराचा साम्यवादी विद्यार्थी संघटनांकडून विरोध !

नवरात्रीच्या काळात बांगलादेशात हिंदूंवर आक्रमणे झाली, काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य करून ठार करण्यात आले, त्याविरोधात साम्यवादी विद्यार्थी संघटनांना विरोध करण्याचे का आठवले नाही ? हिंदूंच्या विषयी काही घडले, तर ते मौन का बाळगतात, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे ! – संपादक

जे.एन्.यू.एस्.यू. या साम्यवादी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी त्रिपुरा येथे मुसलमानांवरील आक्रमणांच्या विरोधात जे.एन्.यू. परिसरात मोर्चा काढला. या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, त्रिपुरामध्ये मुसलमानांवर तेथील भाजप सरकार आणि अनेक संस्था अत्याचार करत आहेत.