पाकच्या कोटरी शहरात देवी मातेच्या मंदिरात चोरी !

चांदीचे १० तोळ्यांचे ३ हार आणि २५ सहस्र रुपयांची चोरी

पाकमध्ये असुरक्षित असलेले हिंदू आणि त्यांची मंदिरे ! – संपादक

पाकच्या सिंध प्रांतातील कोटरी शहरातील मंदिर

कोटरी (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील कोटरी शहरातील देवी मातेच्या मंदिरात चोरट्यांनी चोरी करून देवीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. यात देवीचे १० तोळ्यांचे चांदीचे ३ हार आणि २५ सहस्र रुपये होते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, मंदिर व्यवस्थापनाला संशय आहे की जवळच्या निवासी भागातील कुणीतरी मंदिर लुटले आहे. मंदिर किंवा मंदिरातील देवतांच्या मूर्ती यांची तोडफोड झालेली नाही.

सिंध प्रांतातील अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री ज्ञानचंद इराणी यांनी सांगितले की, काही दिवसांत हिंदू दिवाळीचा सण साजरा करणार आहेत, अशा वेळी अशी घटना खपवून घेतली जाणार नाही. मंदिरांभोवती सुरक्षा वाढवण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. त्यामुळे अशा घटनांना अगोदरच आळा बसेल.